कोल्हापूर : कोल्हापूर-नागपूर ही विमानसेवा गुरुवारपासून सुरू होणार आहे. आठवड्यातील पाच दिवस १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकोनॉमी क्लास आसनव्यवस्था असलेल्या विमानाचे कोल्हापुरातून नागपूरसाठी उड्डाण होईल. यामुळे कोल्हापूर थेट राज्याच्या उपराजधानीशी हवाईमार्गे जोडले गेले आहे. स्टार एअरवेज कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे.कधी असेल सेवा..?मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील पाच दिवस कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर विमानसेवा सुरू राहील.कशा असतील वेळा..?नागपूरहून सकाळी १० वाजता विमान उड्डाण करेल. हे विमान सकाळी ११:३० वाजता कोल्हापुरात येईल. दुपारी १२ वाजता कोल्हापुरातून विमान उड्डाण करेल. हे विमान दुपारी १:३० वाजता नागपूरमध्ये पोहोचेल.
अशी असेल आसनव्यवस्था
- बिझनेस क्लास : १२
- इकोनॉमी क्लास : ६४
हैदराबाद, बंगळुरूसाठी उद्यापासून प्रारंभकोल्हापूर-हैदराबाद-कोल्हापूर व कोल्हापूर-बंगळुरू ही विमानसेवा शुक्रवारपासून सुरू होईल. आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी ही सेवा असेल. सकाळी ९:३५ मिनिटांनी स्टारचे विमान हैदराबादवरून उड्डाण करेल. ते १०:४० मिनिटांनी कोल्हापुरात येईल. दुपारी ३ वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण केलेले स्टार एअरवेजचे विमान ४:०५ मिनिटांनी हैदराबादमध्ये पोहोचेल. प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर-बंगळुरू-कोल्हापूर या मार्गावर स्टार एअरवेजने सेवा सुरू केली आहे.
कोल्हापुरातून सकाळी ११:०५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल. ते १२:३५ मिनिटांनी बंगळुरूमध्ये उतरेल. तर बंगळुरूमधून दुपारी १:०५ मिनिटांनी विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल. ते २:३५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल.