कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, हक्काचे पॉकेट बदलल्याने निवडणूक आव्हानात्मक; २८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:20 IST2025-09-04T12:19:21+5:302025-09-04T12:20:09+5:30

पारंपरिक बालेकिल्ले दुसऱ्याच प्रभागात गेल्याने एकाच वॉर्डात सतत गुलाल घेणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले

Kolhapur Municipal Corporation's ward structure announced, election challenging as rights pockets change | कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, हक्काचे पॉकेट बदलल्याने निवडणूक आव्हानात्मक; २८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग

कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, हक्काचे पॉकेट बदलल्याने निवडणूक आव्हानात्मक; २८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासूनच प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची प्रभाग रचना अखेर बुधवारी जाहीर झाली. या रचनेत पारंपरिक बालेकिल्ले दुसऱ्याच प्रभागात गेल्याने एकाच वॉर्डात सतत गुलाल घेणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

या नव्या रचनेनुसार एकूण २० प्रभागांतून ८१ सदस्य निवडले जणार असून, एक ते १९ प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. तर २० नंबरचा प्रभाग हा पाच सदस्यीय आहे. तब्बल २५ ते २८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असणार असून या प्रभाव रचनेवर १५ सप्टेंबरपर्यंत हरकती मागविल्या आहेत.

या प्रभाग रचनेवर १५ सप्टेंबरपर्यंत हरकती मागविल्या आहेत. महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता ही प्रभाग रचना जाहीर केली. नागरिकांसाठी ती महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहासह विभागीय कार्यालयातही पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

वाचा- प्रभागात चार, इच्छुकांचे लॉबिंग जोरदार; कोल्हापूर महापालिका निवडणुकीत नेत्यांचे डोके 'ताप'णार

कोल्हापूर महापालिकेत पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग रचना केली आहे. नव्या रचनेमुळे एका एका प्रभागात दिग्गज नेत्यांचे भाग आल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागणार आहे. यामुळे आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष व उमेदवारांची कसोटी लागणार आहे. प्रभाग रचना उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण दिशा या पद्धतीने केली आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्यामुळे नगरसेवक आता २४ ते २५ हजारांहून अधिक लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

प्रभाग क्रमांक वीसमध्ये एकूण पाच सदस्य असतील. या प्रभागाची लोकसंख्या ३२ हजार १२१ इतकी आहे. प्रभाग रचना जाहीर करताना त्या प्रभागाची व्याप्ती, एकूण लोकसंख्या, अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीची लोकसंख्या जाहीर केली आहे.

प्रभाग एकमधील लोकसंख्या २७ हजार ७९१ इतकी आहे. प्रभाग क्रमांक दोनची लोकसंख्या २५ हजार ७१७ इतकी आहे. तीनची लोकसंख्या २५ हजार ३५७ तर प्रभाग सहामधील लोकसंख्या २५ हजार ३९४ आहे.

बावडा दोन प्रभागात विभागला

महापालिकेचे प्रभाग हे कसबा बावड्यापासून सुरू होतात. नव्या रचनेनुसार बावडा हा प्रभाग क्रमांक एक व पाच अशा दोन भागांत विभागला आहे. प्रभाग क्रमांक एक हा गोळीबार मैदान, हनुमान तलाव, कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान, बिरंजे पाणंद, भगवा चौक, कसबा बावडा पंचगंगा वैकुंठभूमी, आंबेडकरनगर असा आहे. तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये भगवा चौकातील काही भाग, रेणुकानगर, त्र्यंबोलीनगर, पोलिस लाईन, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ते नागाळा पार्कपर्यंत विभागला आहे.

दृष्टिक्षेपात प्रभाग

  • एकूण सदस्य-८१
  • चार सदस्यांचे प्रभाग-१९
  • पाच सदस्यांचे प्रभाग-१
  • एकूण प्रभाग-२०
  • हरकती दाखल करण्याची मुदत : ३ ते १५ सप्टेंबर
  • अंतिम प्रभाग प्रारूप रचना जाहीर : ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान


प्रभाग क्रमांक २० सर्वात मोठा

नव्या प्रभाग रचनेत सुर्वेनगरपासून कळंबा तलावापर्यंतचा प्रभाग क्रमांक २० हा क्षेत्रफळ व लोकसंख्येच्यादृष्टीने सर्वात मोठा प्रभाग आहे. तर सिद्धार्थनगर, जुनाबुधवार तालीम परिसर, तोरस्कर चौक यांचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक ६ हा तुलनेने कमी क्षेत्रफळाचा प्रभाग आहे.

सध्या या प्रभाग रचनेचा अभ्यास सुरू आहे. जर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन ही प्रभागरचना केली आहे, असे अभ्यासांती वाटले तर याविरोधात हरकती दाखल करणार आहे. -सचिन चव्हाण, शहराध्यक्ष, काँग्रेस, कोल्हापूर.

निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ही प्रभाग रचना झाली आहे. चार प्रभाग सदस्यसंख्येमुळे प्रभागात सर्वांगीण काम करण्यास संधी मिळणार आहे. एखादा नगरसेवक काम करत नसेल पण उर्वरित तिघे कामाला प्राधान्य देणारे असतील तर त्या भागातील नागरिकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. -सत्यजित कदम, समन्वयक, शिंदेसेना, कोल्हापूर.

प्रभागरचना नेमकी कशी झाली आहे, भौगोलिक स्थिती, स्थाने याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेणे सुरू आहे. ही माहिती आल्यानंतर त्यावर चर्चा होऊन पुढील दिशा ठरवली जाईल. - विजय जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप, कोल्हापूर

प्रभाग रचनेचा अभ्यास करून त्यानंतर हरकतींचा निर्णय घेणार आहे. नव्या रचनेत प्रभाग मोठा असल्याने इच्छुक उमेदवारांचा कस लागणार, हे निश्चित आहे. - आर.के. पोवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, कोल्हापूर

Web Title: Kolhapur Municipal Corporation's ward structure announced, election challenging as rights pockets change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.