कोल्हापूर मनपाने १० कोटी भरावे, मगच पाणीपट्टीत सूट; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बजावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:31 IST2025-04-17T12:30:33+5:302025-04-17T12:31:23+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकीत असलेल्या पाणीपट्टीच्या एकूण रकमेपैकी १० कोटींची रक्कम दोन टप्प्यात तातडीने भरावी. ही रक्कम भरल्यानंतर ...

कोल्हापूर मनपाने १० कोटी भरावे, मगच पाणीपट्टीत सूट; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बजावले
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेकडे थकीत असलेल्या पाणीपट्टीच्या एकूण रकमेपैकी १० कोटींची रक्कम दोन टप्प्यात तातडीने भरावी. ही रक्कम भरल्यानंतर उर्वरित थकीत रकमेत सूट देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत बजावले.
महानगरपालिकेच्या थकीत पाणीपट्टीसंदर्भात जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार अमल महाडिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या.
मंत्री विखे पाटील म्हणाले, महानगरपालिकेकडे पाणीपट्टीपोटी सुमारे ६२ कोटींची रक्कम थकीत आहे. यापैकी आतापर्यंत ८ कोटी महापालिकेने भरले आहेत. उर्वरित रकमेतील १० कोटींची रक्कम दोन हप्प्यात भरा. त्यानंतर यासंदर्भात महापालिका व जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन उर्वरित रकमेसंदर्भात मार्ग काढावा. उर्वरित थकीत पाणीपट्टींमध्ये सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल.
महानगरपालिकेने यावर्षी ८ कोटी पाणी पट्टी भरली असल्याबाबतची माहिती महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली. सन २०२५ ते २०३१ पर्यंत पाणी उपलब्ध होण्यासंदर्भात महानगरपालिकेने पाणी करार केला आहे. यावर्षीपासून प्रतिमहा पाणीपट्टी भरण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.