Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: दोन तासांत नेमली चौकशी समिती, आज अहवाल देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:08 IST2025-10-01T12:06:48+5:302025-10-01T12:08:46+5:30
कामाच्या दर्जाबाबत उलटसुलट चर्चा

Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: दोन तासांत नेमली चौकशी समिती, आज अहवाल देणार
कोल्हापूर : महापालिकेच्या फुलेवाडी येथील फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी रात्री उशिरा या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व उपशहर अभियंता रमेश मस्कर यांची दोन सदस्यीय समिती नेमली आहे. या चौकशीचा अहवाल आज, बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फुलेवाडी अग्निशमन केंद्र विकास व कर्मचारी निवासस्थान इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळल्याने शहरभर संतापाची लाट निर्माण झाली. सोशल मीडियावरही महापालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होऊ लागल्याने प्रशासकांनी तातडीने या इमारतीच्या कामाच्या दर्जाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली.
वाचा- कोल्हापूर महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला; १ ठार, ५ जखमी
या इमारतीचा दर्जा, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर केला आहे का, स्लॅब टाकण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य होते का, याची चौकशी करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त आडसूळ व उपशहर अभियंता मस्कर यांची समिती प्राथमिक चाैकशी करुन आज, बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत त्याचा अहवाल प्रशासकांना देणार आहे.
कामाच्या दर्जाबाबत उलटसुलट चर्चा
मुळात या इमारतीचे काम सुरू असल्यापासून फायर स्टेशनमधील अनेक अधिकारी-कर्मचारीच कामावर समाधानी नव्हते. कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी काही दिवसांपूर्वी फायर स्टेशनमधील कर्मचाऱ्यानी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. मात्र, त्याकडे डोळेझाक केल्यानेच या दुर्दैवी प्रकाराला सामोरे जावे लागल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.