कचरा डेपोतील भंगार विक्री रॅकेटमध्ये कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी; आरोग्य निरीक्षक सेवामुक्त, मुकादम निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:49 IST2025-05-07T13:49:11+5:302025-05-07T13:49:32+5:30

चौकशी समितीत स्पष्ट 

Kolhapur Municipal Corporation employees involved in scrap metal sales racket at garbage depot, Health inspector discharged | कचरा डेपोतील भंगार विक्री रॅकेटमध्ये कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी; आरोग्य निरीक्षक सेवामुक्त, मुकादम निलंबित

कचरा डेपोतील भंगार विक्री रॅकेटमध्ये कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी; आरोग्य निरीक्षक सेवामुक्त, मुकादम निलंबित

कोल्हापूर : कसबा बावडा लाइन बझार येथील महानगरपालिकेच्या घन कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थळावरील लोखंडी भंगार चोरीत सहभाग असल्याच्या आरोपातून ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे यांना महापालिका आरोग्य सेवेतून मुक्त केले. झाडू कामगार तथा मुकादम दादासो जयवंत लोंढे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी ही कारवाई केली. कारवाईनंतर भंगार चोरीत रॅकेट असल्याचेही उघड झाले आहे.

झूम प्रकल्पावर कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते. येथील लोखंडी भंगार चोरीला गेल्याची तक्रार महापालिकेकडे झाली होती. यावरून २० मार्च २०२५ रोजी सहायक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी केलेल्या पाहणीत काही भंगार साहित्य चोरून नेण्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आरोग्य निरीक्षक कावडे, खासगी ठेकेदार, प्रकल्प स्थळावरील पोकलेन ऑपरेटर, स्क्रॅप खरेदी, विक्री करणारी व्यक्ती, खासगी ठेकेदाराकडील ट्रॅक्टर चालक यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.

नोटीसला उत्तर देताना पोकलेन ऑपरेटर, स्क्रॅप खरेदी, विक्री करणारी व्यक्ती तसेच खासगी ठेकेदाराकडील ट्रॅक्टर ट्रॉली चालकांनी आरोग्य निरीक्षक कवडे यांच्या सांगण्यावरूनच भंगार दोन वेळेस विक्री केल्याचे लेखी उत्तर दिले. त्यानंतर कवडे यांना या प्रकरणात दोषी ठरवून ठोक मानधनावर असल्याने सेवेतून मुक्त केले.

दरम्यान, भंगार चोरी वेळी झाडू कामगार तथा मुकादम दादासो लोंढे कार्यरत होते. मात्र, लोंढे यांनी महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण, जतन न करता भंगार चोरीला मदत केली. लोंढे यांनीच दोनवेळा स्वत: भंगार चोरणाऱ्यासोबत केले आणि विक्रीस मदत केली.

पैसे स्वीकारले

भंगार विकल्यानंतर आलेले पैसे दादासो लोंढे यांनी स्वत: स्वीकारल्याचेही चौकशीतून पुढे आले आहे. हे महापालिकेचे कर्मचारी असल्याने त्यांना थेट सेवेतून मुक्त न करता निलंबित केले आहे. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

Web Title: Kolhapur Municipal Corporation employees involved in scrap metal sales racket at garbage depot, Health inspector discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.