कोल्हापूर-मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग; खासदार, पालकमंत्र्यांची खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 04:12 IST2025-05-16T04:11:59+5:302025-05-16T04:12:53+5:30
कोल्हापूर - मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग झाली आहे. सर्वसामान्यांना विमानाने प्रवास करणे सोपे राहिलेले नाही.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग; खासदार, पालकमंत्र्यांची खंत
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: कोल्हापूर - मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग झाली आहे. सर्वसामान्यांना विमानाने प्रवास करणे सोपे राहिलेले नाही. यावर जरा नियंत्रण ठेवा, असे सांगत पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या विमान प्रवासाच्या दाव्याची केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच पोलखोल केली.
आपल्याच सरकारमधील लोकप्रतिनिधींनी उडाण योजनेवर शंका उपस्थित केल्याने मंत्री मोहोळही काही क्षण गोंधळले. मात्र, दुसऱ्याच क्षणी त्यांनी या दरावर नियंत्रण ठेवू, अशी ग्वाही देत सारवासारव केली.
कोल्हापूर विमानतळावरील एटीसी टॉवरच्या उद्घाटनानंतर मंत्री मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूर विमानतळावरून काही मार्गांवर उडाण योजनेंतर्गत सेवा सुरू असतानाही मुंबईला जाण्यासाठी काहीवेळा २० ते २५ हजार रुपये मोजावे लागत असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. याचवेळी खासदार माने यांनी कोल्हापूर - मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग झाली आहे. त्याच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. पालकमंत्री आबिटकर यांनीही हाच मुद्दा पुढे नेत उडाण योजनेंतर्गत किती सर्वसामान्य लोकांनी प्रवास केला, याची माहिती द्या, असे सांगितले.