कोल्हापूर : माथाडी कामगार मंगळवारी संपावर, माथाडी मंडळाच्या विलीनीकरणास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 17:38 IST2018-01-28T17:35:12+5:302018-01-28T17:38:56+5:30
राज्यातील ३६ माथाडी मंडळांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी हमाल माथाडी कामगार मंगळवारी संपावर जाणार आहेत. संपूर्ण राज्यातील माथाडी कामगार एक दिवसाच्या संपात सहभागी होणार असून, कोल्हापुरातील ६०० कामगार संपावर राहिल्याने कामकाज ठप्प होणार आहे.

कोल्हापूर : माथाडी कामगार मंगळवारी संपावर, माथाडी मंडळाच्या विलीनीकरणास विरोध
कोल्हापूर : राज्यातील ३६ माथाडी मंडळांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी हमाल माथाडी कामगार मंगळवारी संपावर जाणार आहेत. संपूर्ण राज्यातील माथाडी कामगार एक दिवसाच्या संपात सहभागी होणार असून, कोल्हापुरातील ६०० कामगार संपावर राहिल्याने कामकाज ठप्प होणार आहे.
राज्य सरकारच्या कामगार विभागाने ३६ माथाडी मंडळांचे विलीनीकरण करून राज्याचे एकच मंडळ स्थापन करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली आहे. याबाबत १७ जानेवारी २०१८ रोजी एक अध्यादेश काढला असून, तो तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी राज्यव्यापी लाक्षणिक संपाचे आयोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, पुणे हेही सहभागी होणार आहे.
दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात माथाडी कामगार एकत्रित येणार आहेत. राज्य सरकारने मंडळाच्या विलीनीकरणाच्या काढलेल्या अध्यादेशाची होळी केली जाणार आहे. त्यानंतर शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.
सर्वच संघटनांचे माथाडी कामगार या संपात सहभागी होणार असल्याने व्यवहार ठप्प होणार आहेत. रेल्वे माल, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी मार्केटसह गूळ मार्केटवरही याचा परिणाम होणार आहे.