Kolhapur: अंबरग्रीस तस्करीत वकील, व्यावसायिकाचा सहभाग, अटकेतील दोघांची पोलिस कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 22:35 IST2023-04-11T22:35:13+5:302023-04-11T22:35:26+5:30
Crime News: व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीसची तस्करी करणारे माधव विलास सूर्यवंशी (वय ३८, रा. बेडकीहाळ, ता. निपाणी, जि. बेळगांव) आणि अविनाश सुभाष खाबडे (वय ३२, रा. लिशां हॉटेल, कोल्हापूर) या दोघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

Kolhapur: अंबरग्रीस तस्करीत वकील, व्यावसायिकाचा सहभाग, अटकेतील दोघांची पोलिस कोठडीत रवानगी
कोल्हापूर : व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबरग्रीसची तस्करी करणारे माधव विलास सूर्यवंशी (वय ३८, रा. बेडकीहाळ, ता. निपाणी, जि. बेळगांव) आणि अविनाश सुभाष खाबडे (वय ३२, रा. लिशां हॉटेल, कोल्हापूर) या दोघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्यांना शनिवारपर्यंत (दि. १५) पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील संशयित सूर्यवंशी हा वकील, तर खाबडे हा व्यावसायिक असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
अटकेतील संशयित सूर्यवंशी आणि खाबडे यांनी आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अंबरग्रीस तस्करीचा मार्ग स्वीकारला. अंबरग्रीस खरेदी करणा-या ग्राहकांच्या शोधात ते होते. मात्र, त्यांना ग्राहक मिळाला नाही, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. एक कोटी ८० लाखांचे अंबरग्रीस त्यांनी कोणाकडून आणले, याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले. कोट्यवधी रुपयांच्या अंबरग्रीसची विक्री करणा-या रॅकेटमध्ये काही व्यावसायिकांसह बडे मोहरे अडकल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती निरीक्षक वाघमोडे यांनी दिली.
पहिलाच गुन्हा
अटकेतील संशयित सूर्यवंशी आणि खाबडे हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी कमी वेळेत जादा पैसे मिळवण्याचा मार्ग ते शोधत होते. याचवेळी त्यांचा कर्नाटक आणि कोकणातील काही व्यक्तींशी संपर्क झाला. त्यातून हे दोघे तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आणखी एक संशयित रडारवर
या गुन्ह्यात आणखी एका तस्कराचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर असून, लवकरच त्याला अटक होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.