कोल्हापूर : बघ्याची भूमिका घ्याल, तर कार्यालय उद्ध्वस्त करू, ‘स्वाभिमानी’चा सहसंचालकांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 13:08 IST2018-12-25T13:05:19+5:302018-12-25T13:08:53+5:30
जानेवारीला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार असाल, तर सहसंचालक कार्यालय जाग्यावर राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिला.

एकरकमी एफआरपीप्रमाणे डिसेंबरअखेर उसाची बिले जमा करा, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांना देण्यात आले. सहकार अधिकारी श्रेणी १ रमेश बारडे व विजय पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी वैभव कांबळे, भगवान काटे, अनिल मादनाईक, रमेश भोजकर, आदी उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव)
कोल्हापूर : यंदाचा हंगाम सुरू होऊन, ४५ दिवस संपले, तरी अद्याप शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेले नाहीत. डिसेंबरअखेर एकरकमी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही, तर १ जानेवारीला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार असाल, तर सहसंचालक कार्यालय जाग्यावर राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिला.
एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, यासाठी सोमवारी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन दिले. यावेळी अनिल मादनाईक यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली.
ऊस जाऊन दीड महिना झाला, तरी पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी करायचे काय? तुम्ही नुसते हातावर हात घालून बसणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. हे कार्यालय जाग्यावर राहणार नाही, हे ध्यानात ठेवावे. कारखान्याला ऊस घातल्याच्या पावत्या देतो, तुम्ही थेट फौजदारी दाखल करा, अशी मागणी मादनाईक यांनी लावून धरली.
मागणीचे निवेदन सहकार अधिकारी श्रेणी - १ रमेश बारडे व लेखापरीक्षक विजय पाटील यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जयकुमार कोले, वैभव कांबळे, भाऊ साखरपे, संभाजी नाईक, इकबाल कलावत, विजय भोसले, रमेश भोजकर, संपत पवार, अजित दानोळे, आण्णा मगदूम, आदी उपस्थित होते.
सचिन रावल रजेवर जातात तरी कसे?
ऊस दरावरून जिल्हा पेटला असताना, विभागाचे जबाबदार अधिकारी सचिन रावल हे रजेवर जातात तरी कसे? ते कामावर असतात तरी कधी, असा सवाल करत शेतकºयांचा पोरखेळ मांडला का? जबाबदारी अधिकारी चर्चेसाठी येत नाहीत तोपर्यंत येथून हालणार नाही, कार्यालयास कुलूप ठोकू, असा इशारा अनिल मादनाईक यांनी दिला.
म्हणून मांजर रात्रीचे शिकार करते
रात्रीचे उंदीर बाहेर पडतात म्हणून मांजर रात्रीचे शिकार करत नाही. वटवाघुळाप्रमाणे मांजराची बुबुळे रात्री उलटी होतात आणि त्याला अंधारातही दिसते, म्हणूनच ते रात्री शिकार करते. हे खरे कारण आहे, तुम्ही कारवाईबाबत चुकीची कारणे सांगू नका, असे आण्णासो चौगुले यांनी सांगितले.