कोल्हापूर: शित्तूर तर्फ मलकापुरात आगीत घर भस्मसात, प्रापंचिक साहित्यासह मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:38 IST2022-11-18T14:37:48+5:302022-11-18T14:38:06+5:30
अनिल पाटील सरुड : शित्तूर तर्फ मलकापूर (ता . शाहूवाडी) येथील संभाजी पांडुरंग पाटील यांच्या घराला आज, शुक्रवारी पहाटे ...

कोल्हापूर: शित्तूर तर्फ मलकापुरात आगीत घर भस्मसात, प्रापंचिक साहित्यासह मोठे नुकसान
अनिल पाटील
सरुड : शित्तूर तर्फ मलकापूर (ता . शाहूवाडी) येथील संभाजी पांडुरंग पाटील यांच्या घराला आज, शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीत संपुर्ण घर भस्मसात झाले. यामध्ये प्रापंचिक साहित्यासह सुमारे सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजी पाटील यांच्या घरात त्यांचे चुलते राजाराम केदारी-पाटील राहत होते. आज, पहाटे तीनच्या सुमारास घराच्या छता दरम्यान असलेल्या लाकडांना अचानक आग लागली. आगीच्या आवाजाने राजाराम पाटील व त्यांच्या पत्नीला जाग आली. दरम्यान त्यांनी आरडा ओरड करताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीने रौद्ररूप धारण केले होते.
मलकापूर नगरपालिकेची अग्नीशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे साडे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. आगीत घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. सरपंच, उपसरपंचासह पोलिस पाटील, गावकामगार तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी करून पंचनामा केला.