कोल्हापूर: शुक्रवारी १७00 ते १९00 क्विंटल असणारा कांदा शनिवारी ७00 ते ११00 पर्यंत खाली आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यां नी शनिवारी बाजार समितीतील सौदेच बंद पाडले. व्यापारी व बाजार समितीने संगनमत करुन दर पाडले आहेत, असा आरोप करत कांदे घेउन आलेल्या परजिल्ह्यातील विशेषता सोलापुरातील शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर निदर्शने करुन ठिय्या मारत आपला रोष व्यक्त केला. बाजार समिती सभापती व सचिवांनी आक्रमक शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर दोन तासांनी सौदे पुर्ववत झाले.
साडेअकराच्या सुमारास अशोक मोटूमल यांच्या अडत दुकानी सौदे काढण्यास सुरुवात झाली. सौद्यात उच्च प्रतीच्या एक नंबर कांद्याला किमान ७00 ते कमाल ११00 रुपये भाव निघाल्याने उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार हरकत घेतली. शुक्रवारी १७00 ते १९00 रुपये प्रतिक्विंटल असणारा भाव अचानक एका दिवसात ७00 ते ११00 कसा झाला याबद्दल व्यापाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने सर्व शेतकऱ्यांनी सौदेच काढणे बंद करत बाजार समितीच्या कार्यालयात धाव घेतली.समिती सभापती कार्यालयात नसल्याने ते येउ पर्यंत कार्यालयासमोरुन उठणार नसल्याचा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. अखेर तासाभरांनी सभापती कृष्णात पाटील आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
कोल्हापूर बाजार समितीवर विश्वास असल्याने गेली २५ वर्षे कांदा घेउन येतोय, त्यातून तुम्हाला उत्पन्नही मिळतेय. पण आतापर्यंत एवढी फसवणूक कधी झाली नाही. हे असेच चालणार असेल तर आम्ही कोल्हापुरात कांदाच घेउन येणार नाही असा इशारा सोलापुरातील एका शेतकऱ्यांने दिला.
सभापती पाटील यांनी आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे, पण त्यात नक्कीच सुधारणा होईल असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. या वेळी कांदा बटाटा असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर चूग, समिती संचालक विलास साठे, भगवान काटे, समिती सचिव मोहन सालपे, सहसचिव के.बी.पाटील यांची उपस्थिती होती.