भूमी अभिलेखच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कोल्हापूरला विजेतेपद; पाच जिल्ह्यांतील ७०० हून अधिक जणांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:36 IST2025-01-07T13:35:47+5:302025-01-07T13:36:14+5:30
‘सांस्कृतिक’मध्ये पुण्याची बाजी

भूमी अभिलेखच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कोल्हापूरला विजेतेपद; पाच जिल्ह्यांतील ७०० हून अधिक जणांचा सहभाग
कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या पुणे विभागीय भूमी अभिलेख कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कोल्हापूर भूमी अभिलेख विभागाने सांघिक खेळ प्रकारात विजेतेपद पटकाविले.
२ ते ४ जानेवारीदरम्यान झालेल्या या स्पर्धांमध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील ७०० हून अधिक भूमी अभिलेखचे कर्मचारी-अधिकारी सहभागी झाले होते. एरव्ही वाड्या-वस्त्यांवर मोजणीच्या कामासाठी धावणारे कर्मचारी-अधिकारी या स्पर्धांच्या निमित्ताने मैदानावर धावताना पाहायला मिळाले. कर्मचाऱ्यांमध्ये सामूहिक एकीची भावना वाढीस लागावी, त्यांच्यामध्ये आरोग्याची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
अपर जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी धुंदवडे (ता. गगनबावडा) येथील जय जिजाऊ विद्यामंदिर लेझीम पथकाच्या सादरीकरणाने या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. यामध्ये १००, २०० मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक, कॅरम, बुद्धिबळ, बॅटमिंटन, टेबल टेनिस या वैयक्तिक खेळासोबत क्रिकेट, फुटबॉल, खोखो, रस्सीखेच यासह विविध खेळ घेण्यात आले.
सांघिक प्रकारात कोल्हापूर जिल्हा भूमी अभिलेख विभागाने विजेतेपद, तर सांगलीने उपविजेतेपद पटकाविले. राजाराम कॉलेजच्या सभागृहात झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात पुणे जिल्ह्याने विजेतेपदावर नाव कोरले. यामध्ये कोल्हापूरला उपविजेतेपद मिळाले.
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना कर्मचारी तहानभूक हरपून गेले. हा कर्मचारी, तो साहेब ही भावनाच पुसली गेली आणि सर्वजण सांस्कृतिक आनंदात तल्लीन होऊन गेले. या कार्यक्रमाला उपसंचालक राजेंद्र गोळे, कोल्हापूरचे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, पुणे जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, सातारचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक वसंत निकम, सांगलीच्या सुरेखा शेटये, सोलापूरचे दादासाहेब घोडके उपस्थित होते.
उत्तम नियोजन
या स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले, करवीरचे अधीक्षक किरण माने यांनी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सक्षमपणे पार पाडली. त्याबद्दल सर्वांनीच त्यांना धन्यवाद दिले.