मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यातून निषेध
By समीर देशपांडे | Updated: October 16, 2023 18:01 IST2023-10-16T17:59:55+5:302023-10-16T18:01:43+5:30
'भाजपचे कार्यकर्ते योग्य त्या प्रकारे धडा शिकवतील'

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यातून निषेध
कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर रविवारी (दि.१५) सोलापूर येथे झालेल्या शाईफेकीचा कोल्हापुरात भाजपच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. संबंधितांना सोलापूरमधील भाजपचे कार्यकर्ते योग्य त्या प्रकारे धडा शिकवतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, प्रदेश सदस्य राहूल चिकोडे यांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला. लोकशाही मार्गाने मागण्या मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतू अशा पध्दतीने जर कोणी वागणार असेल तर असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, राहूल देसाई, नाथाजी पाटील यांनीही पत्राव्दारे पाटील यांच्यावरील शाईफेकीचा निषेध केला आहे.