कोल्हापूर जिल्हा बँकेलाही होती बनावट धनादेशाबाबतची सर्व माहिती, राजकीय दबाव न येता चौकशीची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:29 IST2025-03-01T12:28:48+5:302025-03-01T12:29:19+5:30

सूत्रधार अजूनही अंधारातच

Kolhapur District Bank also had all the information about fake cheques need for investigation without political pressure | कोल्हापूर जिल्हा बँकेलाही होती बनावट धनादेशाबाबतची सर्व माहिती, राजकीय दबाव न येता चौकशीची गरज 

कोल्हापूर जिल्हा बँकेलाही होती बनावट धनादेशाबाबतची सर्व माहिती, राजकीय दबाव न येता चौकशीची गरज 

कोल्हापूर : जिल्हा परिषदेने दिलेल्या तीन धनादेशांबाबत सर्व माहिती जिल्हा परिषदेतूनच मिळाली, असे वातावरण केले जात असले, तरी हे धनादेश मूळ जिल्हा बॅंकेनेच दिले होते. त्यामुळे त्यांच्याकडेही त्याबाबतची सर्व माहिती होती. राजकीय दबाव न येता याचा तपास झाला, तरच धनादेशाची माहिती नक्की कुणाकडून गेली हे स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बॅंकेतील जिल्हा परिषदेच्या खात्यांचा रोजच्या रोज आढावा घेण्यात येत असतो. शुक्रवारी २१ फेब्रुवारीला ताळमेळ घेताना तब्बल १८ कोटी ४ लाख रुपये खर्च पडल्याचे निदर्शनास आले आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली. संभाव्य फसवणूक टाळण्यात यश आले असले, तरी आरोपांचा धुरळा सुरू झाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री जे स्वत: जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी संशयाची सुई जिल्हा परिषदेकडे वळवल्याने, तर अधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. याला कोणतेही प्रत्युत्तर देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. 

या प्रकरणामध्ये पोलिसच कसून तपासणी करू शकत असल्याने आणि त्यातूनच नेमका प्रकार समोर येणार असल्याने तोपर्यंत किमान फसवणूक टळली, यावर ते समाधान मानत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत आकुर्डे यांनी तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना कल्पना दिली. या दोघांनी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेतली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष म्हणून मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनाही या प्रकाराबाबत तातडीने माहिती देण्यात आली.

सुट्टीदिवशी धनादेशाला मंजुरी

ज्यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते, त्या दिवशी एखाद्या कर्मचाऱ्यास बँकेत यायचे झाल्यास त्याची मुख्यालयास पूर्वसूचना द्यावी लागते. १९ फेब्रुवारीस शिवजयंतीची बँकेला आणि जिल्हा परिषदेलाही सुट्टी असताना, तशी सूचना जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील लेखापाल अजित पाटील यांनी दिली होती का ? इतक्या मोठ्या रकमेचा धनादेश सुट्टीदिवशी मंजूर करताना खरेच त्याची तेवढी तीव्रता आहे का, याचाही विचार झालेला नाही. ते सुट्टीदिवशी बँकेत का आले, का त्यांना कुणी जायला सांगितले, असेही गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. एवढी गंभीर चूक करूनही बँकेने त्यांना फक्त साधी नोटीस काढली आहे.

Web Title: Kolhapur District Bank also had all the information about fake cheques need for investigation without political pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.