SSC Result 2025: कोल्हापूर भारी; राज्यात दुसरा, विभागात अव्वल; ९७.५२ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:50 IST2025-05-14T15:49:58+5:302025-05-14T15:50:28+5:30
विभागात १३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण

SSC Result 2025: कोल्हापूर भारी; राज्यात दुसरा, विभागात अव्वल; ९७.५२ टक्के निकाल
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९७.५२ टक्के गुणांसह प्रथम येण्याचा मान पटकाविला. विशेष म्हणजे बारावीनंतर दहावीतही कोल्हापूर जिल्हा विभागात अव्वल राहिला आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९८.२० टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदा ०.६८ टक्क्यांनी निकाल घटला आहे.
जिल्ह्यातील ९३६ शाळांमधील ५३ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यातील ५२ हजार ३९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पुन:प्रविष्ट विद्यार्थ्यांमध्ये ४२५ पैकी १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात ९८.३८ टक्के मुली उत्तीर्ण
जिल्ह्यात २९ हजार ६६५ मुलांपैकी २८ हजार ७२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.८१ टक्के आहे. तर २४ हजार ०६१ मुलींपैकी २३ हजार ६७३ मुली उत्तीर्ण झाल्या. त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.३८ टक्के आहे.
विभागात १३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण
विभागात १३ विद्यार्थ्यांना ३५ गुण मिळाले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात तीन विद्यार्थी ३५ टक्के गुणांसह काठावर पास झाले. दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. ज्यांना चांगले गुण मिळाले त्यांनी जल्लोष केला. मात्र, जे काठावर पास झाले अशा विद्यार्थ्यांनीही आंनदोत्सव साजरा केला. कोल्हापूर शहरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलचा रेहान रिजाय पिरजादे, हातकणंगले तालुक्यातील इंचलकरंजी शहापूर हायस्कूलचा सुशांत अमोल काळे, तर इचलकरंजीच्या आंतरभारती विद्यालयाचा आतिष लक्ष्मण भोसले यांना ३५ टक्के गुण मिळाले.
दृष्टिक्षेपात निकाल
- एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी : ५३,७२६
- उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ५२,३९४
- एकूण निकाल : ९७.५२ टक्के
- गतवर्षीचा २०२४ चा निकाल : ९८.२० टक्के
राज्यात निकालात व कॉपीमुक्त अभियानात कोल्हापूर विभाग अव्वल आहे. राज्यस्तरावरून वेळोवळी मार्गदर्शन, शाळांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा येण्यास मदत झाली. - राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय मंडळ.