मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापुरी थाट; अनुप जत्राटकर, मंगेश गोटुरे, कुणाल लोळसुरे यांचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:24 IST2025-08-09T12:23:39+5:302025-08-09T12:24:38+5:30
कोल्हापूरच्या अनुप जत्राटकर, मंगेश गोटुरे, कुणाल लोळसुरे यांचा सन्मान

मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये कोल्हापुरी थाट; अनुप जत्राटकर, मंगेश गोटुरे, कुणाल लोळसुरे यांचा सन्मान
कोल्हापूर : कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या ‘गाभ’ या चित्रपटाला ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार मिळाले. ‘गाभ’साठी कोल्हापूरचा दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि निर्माता म्हणून मंगेश गोटुरे या दोघांना तर ‘श्यामची आई’ चित्रपटासाठी कोल्हापूरच्याच कुणाल लोळसुरे याला उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचा पुरस्कार मिळाल्याने हे सारे कोल्हापुरी या साेहळ्यात झळकले.
‘गाभ’ या चित्रपटाला ‘कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ‘कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ असे दोन पुरस्कार मिळाले. वरळी येथे मंगळवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात दिग्दर्शक जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना कोल्हापूरचेच सुपुत्र आणि प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरविण्यात आले.
याशिवाय याच सोहळ्यात कोल्हापूरचाच सुपुत्र कुणाल लोळसुरे यालाही ॲड. गुरु भरत दाभोळकर यांच्या हस्ते सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपटासाठी उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचा पुरस्कार मिळाल्याने हे सारे कोल्हापुरी या साेहळ्यात झळकले. कुणाल हिंदीत आणि वेब सिरीजसाठी जास्त प्रसिद्ध आहे. परेश मोकाशी, तेजपाल यांच्या मराठी प्रकल्पासह सुजयसोबत केसरीनंतर त्याने साऊंड डिझायनर आणि साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम केले आहे. तो भारतीय चित्रपट आणि वेब इंडस्ट्रीत ९ वर्षांपासून सक्रिय आहे.
साऊंड डिझाईनचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बंदिश बँडिट्स, गहराइयां, केसरी, सेक्रेड गेम्स, होस्टेजेस, अफवा, तणाव, जहानाबाद यांसारख्या अनेक गाजलेल्या प्रकल्पांसाठी काम केले आहे. कथा अधिक प्रभावी करण्यासाठी ध्वनीचा कल्पक वापर आणि तंत्रज्ञानाशी हातमिळवणी हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे.