कोल्हापूर सर्किट बेंचकडे ५० ते ६० हजार खटले वर्ग; कागदपत्रांचे गठ्ठे बांधून तयार, किती वकील काम करणार.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:03 IST2025-08-11T12:02:32+5:302025-08-11T12:03:05+5:30
सर्किट बेंचची वेबसाईटही लवकरच होणार तयार

कोल्हापूर सर्किट बेंचकडे ५० ते ६० हजार खटले वर्ग; कागदपत्रांचे गठ्ठे बांधून तयार, किती वकील काम करणार.. वाचा
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयातील सुमारे ५० ते ६० हजार खटले पहिल्या टप्प्यात कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग केले जातील. यासाठी बहुतांश खटल्यांतील कागदपत्रांचे गठ्ठे बांधून तयार आहेत. लवकरच सर्व कागदपत्रे सर्किट बेंचकडे पोहोचतील. तसेच सर्किट बेंचसाठी स्वतंत्र वेबसाईट तयार केली जाणार आहे. सर्किट बेंचमध्ये सुमारे ७०० वकील काम करणार आहेत. यामुळे सहा जिल्ह्यातील वकिलांना मोठी संधी मिळेल, असा विश्वास जिल्हा बार असोसिएशनने व्यक्त केला.
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांपैकी सुमारे ५० ते ६० हजार खटले पहिल्या टप्प्यात कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग केले जातील. याचे कामकाज कोल्हापुरात चालणार असल्याने उच्च न्यायालयाने कागदपत्रांचे गठ्ठे बांधून ठेवले आहेत. सर्किट बेंच इमारतीचे काम पूर्ण होताच कागदपत्र कोल्हापुरात पोहोचतील. दरम्यान, या सर्व खटल्यांची स्थिती वेबसाइटवरही पाहता येईल. यासाठी सर्किट बेंचची स्वतंत्र वेबसाइट तयार करण्याचे काम सुरू आहे.
कामकाज सुरू झाल्यानंतर हळूहळू या बाबी पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनने दिली. सध्या मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील सुमारे दीडशे ते दोनशे वकील काम करीत आहेत. यांच्यासह सहा जिल्ह्यातील एकूण ७०० वकील सर्किट बेंचमधील खटल्यांचे कामकाज पाहणार आहेत.
एकूण चार न्यायमूर्ती
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी एक डिव्हिजन बेंच आणि दोन सिंगल बेंच मंजूर झाले आहेत. डिव्हिजन बेंचमध्ये दोन न्यायमूर्ती असतील, तर दोन सिंगल बेंचसाठी स्वतंत्र दोन न्यायमूर्ती असतील. असे एकूण चार न्यायमूर्ती सर्किट बेंचचे कामकाज पाहतील, अशी माहिती बार असोसिएशनने दिली.
ही कामे चालणार
सर्किट बेंचमध्ये सहा जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी खटले, अपिल, जनहित याचिका, जामीन अर्ज, तक्रार अर्ज, हरकती, रिट पिटिशनचे काम चालणार आहे. यामुळे वेळेत न्याय मिळणे शक्य होणार आहे.
न्यायमूर्तींच्या नियुक्तीचा आदेश लवकरच
सर्किट बेंचच्या कामकाजासाठी तीन रजिस्ट्रार आणि १४ सरकारी वकिलांची नियुक्ती झाली आहे. चार न्यायमूर्तींची नियुक्ती अद्याप बाकी आहे. याबाबतच आदेश लवकरच निघण्याची शक्यता आहे. लिपिकांसह अन्य कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्टला सर्किट बेंचमध्ये हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे १५० कर्मचा-यांचा स्टाफ असेल, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनने दिली.
पार्किंगसाठी आज महापालिका प्रशासनाशी चर्चा
सर्किट बेंचचे कामकाज सुरू होताच वकील आणि पक्षकारांच्या वाहनांचे पार्किंग कुठे करायचे, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यासाठी सोमवारी (दि. ११) महापालिकेच्या प्रशासक मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितले. दसरा चौक, खानविलकर पंपाजवळील १०० फुटी रोड, व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा हे पर्याय सुचवले जातील. याबाबत प्रशासन योग्य निर्णय घेईल, अशी माहिती वकिलांनी दिली.