कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:53 IST2025-11-12T11:53:11+5:302025-11-12T11:53:53+5:30
शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या पाळीव बैलावर हल्ला करून केले ठार

कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
कोल्हापूर: कोल्हापूर शहरात मंगळवारी भरवस्तीत बिबट्या शिरल्याचा थरार घडला. बिबट्या शहरात आल्याची माहिती कळताच एकच खळबळ उडाली होती. या बिबट्याला वनविभागाने तीन तासांच्या थरारानंतर पकडले. ही घटना ताजी असतानाच गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथे देखील बिबट्या दिसून आला आहे. या बिबट्याने अणदूर येथील शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या पाळीव बैलावर हल्ला करून ठार केले.
शेतकरी विठ्ठल शेळके यांनी त्यांचा बैल अणदूर गावातील कावळटेक परिसरात चरण्यासाठी सोडला होता. यावेळी बैलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेनंतर वनविभागाने कावळटेक जंगलांमध्ये असणाऱ्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाहणी केली असता या कॅमेरात हा बिबट्या दिसून आला आहे. गगनबावडयात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.