कोल्हापूर खंडपीठाचा प्रस्ताव महिन्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:27 IST2025-11-06T15:27:17+5:302025-11-06T15:27:39+5:30
पाणी कुठेच मुरत नाही, हद्दवाढ करा ना

कोल्हापूर खंडपीठाचा प्रस्ताव महिन्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे पूर्ण खंडपीठ होण्यासाठीचा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने पाठवला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला.
कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमात खासदार शाहू छत्रपती यांनी सर्किट बेंचचे खंडपीठ कधी होणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या समोरच उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
तत्पूर्वी, खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते अन् रखडलेल्या प्रश्नांची यादीच वाचून दाखवली. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासह विविध प्रश्न रखडले असल्याचे सांगितले.
कोल्हापूर ते मिरज रेल्वेचे दुहेरीकरण, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे, विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देणे या प्रश्नांचा ऊहापोह करत त्यांनी जिल्ह्यातील १८०० विकासकामांची यादीच सर्वपक्षीय लोकांनी माझ्याकडे दिली असून, ही कामे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला निधी जाहीर केला असल्याचे सांगत ज्यांची घरे, जागा यात जाणार आहेत, त्यांनीही या विकासासाठी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्रिपदाची अदलाबदल...
मुख्यमंत्र्यांना अमेरिकन कंपनीसोबत गुंतवणुकीचा करार करायचा असल्याने मुंबईला लवकर परतायचे होते. त्यामुळे कार्यक्रमात ते अगोदर बोलले आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतील असे त्यांनीच जाहीर केले. आमच्या दोघांत चांगली अंडरस्टॅण्डिंग असून, मुख्यमंत्री पदातही अदलाबदल केली आहे. त्यांच्याकडे दिलेले पद ते नक्की परत करतात याचा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच हशा पिकला.
पाणी कुठेच मुरत नाही, हद्दवाढ करा ना
शाहू छत्रपती यांनी प्रश्नांची यादीच वाचून दाखवल्याचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात कोणत्या प्रकल्पांना किती निधी दिला याची आकडेवारीच सांगितली. खासदार शाहू छत्रपती यांनी केलेल्या मागण्यांबद्दल आम्ही काहीच बोललो नाही तर लोक मग पाणी कुठेतरी मुरते, असे म्हणतात. पाणी कुठेही मुरत नसल्याचे सांगून ते म्हणाले, कोल्हापूरची हद्दवाढ करा, ज्याने-त्याने विरोध करायचे सोडून द्या, कधीतरी त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे.