कोल्हापूर : शाळकरी मुलावर हल्ला, चौघांवर गुन्हा, दुचाकीच्या आडवे आल्याच्या रागातून कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 17:49 IST2017-12-23T17:45:31+5:302017-12-23T17:49:15+5:30
दुचाकीच्या आडवे आल्याच्या रागातून चौघांनी शाळकरी मुलग्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले. रितेश बाळासो भोरे (वय १६, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अभिषेक हवालदार, अमन शेख, अथर्व कुरंदकर, करण (सर्व रा. दौलतनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) दुपारी घडली.

कोल्हापूर : शाळकरी मुलावर हल्ला, चौघांवर गुन्हा, दुचाकीच्या आडवे आल्याच्या रागातून कृत्य
कोल्हापूर : दुचाकीच्या आडवे आल्याच्या रागातून चौघांनी शाळकरी मुलग्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले. रितेश बाळासो भोरे (वय १६, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित अभिषेक हवालदार, अमन शेख, अथर्व कुरंदकर, करण (सर्व रा. दौलतनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) दुपारी घडली.
अधिक माहिती अशी, रितेश भोरे हा राजारामपुरीतील एका शाळेमध्ये दहावीत शिकतो. शुक्रवारी (दि. २२) शाळेतून मित्राला घेऊन तो दुचाकीवरून घरी जात होता. यावेळी राजारामपुरीच्या दहाव्या गल्लीमध्ये अभिषेक हवालदार हा दुचाकीच्या आडवा आल्याने त्यांच्यात वादावादी झाली, त्यातून अभिषेकने आणखी तिघा मित्रांना बोलावून घेत रितेशला बेदम मारहाण केली.
यावेळी अभिषेक हवालदार याने रितेशच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. रक्तबंबाळ होऊन रितेश जाग्यावर कोसळला. यावेळी हल्लेखोर पसार झाले. त्याच्या मित्राने त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.
रितेशचे पितृछत्र सहा वर्षांपूर्वीच हरपले आहे. आई बेकरीमध्ये काम करते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. अशा कुटुंबातील मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. दौलतनगर परिसरातील संशयितांना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही.