बापरे! डॉक्टरांनी जबड्यातून काढली बंदुकीची गोळी; नागपुरात यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:00 AM2017-12-01T10:00:01+5:302017-12-01T10:05:22+5:30

अचानक झालेल्या गोळीबारात एक गोळी एका व्यक्तिच्या जबड्यातून मानेत शिरली. नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे मुख शल्य चिकित्सक डॉ. अभय दातारकर यांनी आपले कौशल्य पणाला लावून ती गोळी अलगद बाहेर काढली.

Bullet fixes in jaw removed successfully by Nagpur Govt.Dental Hospital | बापरे! डॉक्टरांनी जबड्यातून काढली बंदुकीची गोळी; नागपुरात यशस्वी शस्त्रक्रिया

बापरे! डॉक्टरांनी जबड्यातून काढली बंदुकीची गोळी; नागपुरात यशस्वी शस्त्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय दंत रुग्णालयाने स्वीकारले होते आव्हान६५ वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवनदान

आॅनलाईन लोकमत
नागपूर : अचानक झालेल्या गोळीबारात एक गोळी एका व्यक्तिच्या जबड्यातून मानेत शिरली. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीजवळ येऊन थांबल्याने पुढील धोका टळला, मात्र आता धोका होता तो शस्त्रक्रियेदरम्यान फसलेली बंदुकीची गोळी काढण्याचा. कारण एका क्षुल्लक चुकीने रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीला इजा पोहचण्याची शक्यता होती. परंतु मुख शल्य चिकित्सक डॉ. अभय दातारकर यांनी आपले कौशल्य पणाला लावून ती गोळी अलगद बाहेर काढली. त्या रुग्णाला जीवनदान मिळाले.
विशेष म्हणजे ही घटना कुठल्या खासगी रुग्णालयातील नाही तर नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील आहे. येथेही आता गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्याने गरजू व गरीब रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे.
सदाराम ठाकूर (६५) रा. पाडापापडा, जिल्हा गडचिरोली असे त्या इसमाचे नाव आहे. सदाराम ठाकूर हे २१ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कोंबड्याची झुंज लावण्यास बाजारात गेले. त्याचवेळी अचानक गोळीबार झाला. त्यांच्या बाजूला असलेले सुनील पवार यांना गोळी लागल्याने ते खाली कोसळले. एक गोळी सदाराम यांच्या गालात शिरली. परंतु या गडबडीत आपल्याला गोळी लागली हे सदारामला कळलेच नाही. ते कोंबडा कुठे गेला हेच पाहत होते, परंतु जेव्हा शर्टवर रक्ताचे डाग दिसले तेव्हा ते घाबरले आणि पायीच गावाकडे निघाले. त्यांच्या मुलाने त्यांना रस्त्यातच गाठून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंडरी येथील प्रथामिक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिरोली जिल्हा रुग्णालयात पाठविले. परंतु येथेही केवळ मलमपट्टी करून चंद्रपूर रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. अखेर रात्री १.३० वाजताच्या सुमारास सदाराम ठाकूर यांना नागपुरातील मेडिकल रुग्णालयात पाठविले. येथील आकस्मिक विभागात तपासणी झाल्यावर शासकीय दंत रुग्णालयाच्या मुख शल्यचिकित्सा विभागाच्या वॉर्डात भरती करण्यात आले.


गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
मुख शल्य चिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर म्हणाले, सदाराम ठाकूर यांच्या डाव्या गालातून बंदुकीची गोळी आत शिरली. खालचा जबडा चिरत ती मानेजवळ येऊन फसली. ‘एक्स-रे’मध्ये गोळी कुठे आहे हे दिसत असले तरी कुठल्या टिश्यूमध्ये आहे हे शोधणे कठीण होते. शस्त्रक्रियेला सुरुवात केली तेव्हा ही गोळी मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीजवळ होती. यामुळे मोठ्या शिताफीने ही गोळी काढावी लागली. गोळी काढल्यानंतर सदाराम ठाकूर यांचा चकनाचूर झालेल्या जबड्यावर शस्त्रक्रिया करून ‘रिकन्स्ट्रक्शन’ करण्यात आले.

रुग्णालयाची जबाबदारी वाढतेय
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची दिवसागणिक जबाबदारी वाढत आहे. अशा गंभीर स्वरूपातील शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्याने जबाबदारीत आणखी भर पडत आहे. महाविद्यालयाच्या या सुवर्ण महोत्सवाच्या काळात रुग्णांच्या सोयींसाठी अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.
-डॉ. सिंधू गणवीर
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: Bullet fixes in jaw removed successfully by Nagpur Govt.Dental Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य