सातारा हिल मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मारली बाजी; ऋतुजा पाटील, सोनाली देसाई विजेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:07 IST2025-09-15T12:06:12+5:302025-09-15T12:07:29+5:30
देशभरातून आलेल्या तब्बल ८ हजार २०० धावपटूंनी निसर्गाचे आव्हान स्वीकारत २१ किलो मीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मारली बाजी; ऋतुजा पाटील, सोनाली देसाई विजेते
कोल्हापूर : साताऱ्याच्या डोंगर-दऱ्यांत रविवारी रंगलेल्या १४ व्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्येकोल्हापूरच्या खेळाडूंनी बाजी मारली. महिला गटात कोल्हापूरच्या ऋतुजा पाटील, सोनाली देसाई यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत देशभरातून आलेल्या तब्बल ८ हजार २०० धावपटूंनी निसर्गाचे आव्हान स्वीकारत २१ किलो मीटरची ही खडतर शर्यत पूर्ण केली. सातारा रनर्स फाउंडेशनने स्पर्धा आयोजिली होती. स्पर्धेला सकाळी ६:३० वाजता पोलिस परेड मैदानावरून सुरुवात झाली.
ऋतुजा ही मूळच्या गडहिंग्लज येथील आहे. कुटुंबात क्रीडा क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमीवर नाही. तिच्या वडिलांचे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. ती स्थानिक शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करते. सन २०१६ पासून तिचा सातत्याने सराव सुरु आहे. खडतर प्रवास करत तिने मुंबई येथे झालेल्या दहा किलोमीटर चँलेज स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला. त्यानंतर पारगड (ता. चंदगड) येथे झालेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक पटकावून विजयी घाेडदौड सुरू ठेवली. ती डॉ. घाळी महाविद्यालयात बीएसस्सीच्या तिसऱ्या वर्षात शिकते. स्कूल गेम क्रॉसकंट्रीमध्ये तिने राष्ट्रीय पदक पटकाविले. विद्यापीठ इंटरझोन आणि एनसीसीत राष्ट्रीय सुवर्णपदक पदाची मानकरी असल्याची माहिती प्रशिक्षक हरिदास शिंदे यांनी सांगितले.
सोनाली या पोलिस दलात कॉन्स्टेबल आहेत. शहापूर (इचलकरंजी) पोलिस ठाण्यामध्ये त्या कार्यरत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून त्या सराव करतात. घाटकोपर (मुंबई) येथील ऑल इंडिया पोलिस गेम्सही सराव करतात. पोलिस दलात रुजू होण्यापूर्वी त्यांनी क्रीडाक्षेत्रात चमक दाखविली आहे. हायस्कूल स्तरावर झालेल्या स्पर्धेतून राष्ट्रीय पदके पटकाविली आहे. गेल्या सहा वर्षापासून त्यांचा सराव सुरू आहे. त्यांची मोठी बहीण पोलिस दलात मुख्यालयात सेवेत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे सोनाली देसाई यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या पल्लवी मूग यांची बाजी
या स्पर्धेत अठरा वर्षांच्या तरुणांपासून ते वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांनी देखील सहभाग घेतला. कोल्हापूरच्या पल्लवी मूग यांनी महिलांच्या ४५ ते ४९ वयोगटात प्रथम येणाऱ्या बहुमान पटकवला. त्यांनी २१ किलोमीटर अंतर १ तास ५९ मिनिटे आणि २८ सेकंदात पूर्ण केले.
स्पर्धेतील विजेते व त्यांनी नोंदविलेली वेळ !
महिला गटात ऋतुजा विजय पाटील यांनी २१ किलोमीटरचे अंतर १ तास, ३० मिनिटे ५२ सेंकदात पूर्ण केले. तृतीय क्रमांक पटकाविलेल्या सोनाली धोंडिराम देसाई यांनी हे अंतर १ तास, ३३ मिनिटे ४२ सेंकदात पूर्ण केले.