KMT bus 'Phul' on Jotiba road | जोतिबा मार्गावरील केएमटीची बस ‘फुल्ल’
जोतिबा मार्गावरील केएमटीची बस ‘फुल्ल’

ठळक मुद्देजोतिबा मार्गावरील केएमटीची बस ‘फुल्ल’रविवारच्या विशेष बससेवेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका परिवहन उपक्रमाने (के.एम.टी) दर रविवारी श्री जोतिबा दर्शनासाठी विशेष बससेवा सुरू केली आहे. या बससेवेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ डिसेंबरपासून या सेवेला सुरुवात झाली असून, भाविकांनी बस तुडुंब भरलेली असते. बसच्या प्रतीक्षेसाठी स्थानिकांसह परगावच्या भाविकांची बसथांब्यांवर गर्दी होत आहे.

तोटा कमी करण्यासाठी केएमटी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये जोतिबा (वाडी रत्नागिरी), पन्हाळा आणि राशिवडे हे तीन नवीन बसमार्ग सुरू केले होते. सुरुवातीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, फायदा होण्याऐवजी नंतर तोटा होत असल्यामुळे आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर या मार्गावरील सर्व बसेस बंद करण्यात आल्या.

यानंतर परिवहन समितीच्या बैठकीमध्ये सभापती अभिजित चव्हाण यांनी जोतिबासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दीचा विचार करीत दर रविवारी विशेष बससेवा सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यानुसार १ डिसेंबरपासून दर रविवारी जोतिबा दर्शनासाठी विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जोतिबा बससेवेचा मार्ग

मध्यवर्ती बसस्थानक - छत्रपती शिवाजी चौक - टाऊन हॉलमार्गे जोतिबा व परत येताना जोतिबा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (अंबाबाई मंदिर) ते मध्यवर्ती बसस्थानक.

‘कोल्हापूर दर्शन’केवळ ३५ रुपयांत

‘केएमटी’चा तोटा कमी होण्यासाठी विविध योजना सुरू आहेत. ‘वडाप’कडे प्रवासी आकर्षित होऊ नयेत यासाठी पास योजना आणली आहे. विद्यार्थ्यांच्या पास योजनेसोबत एकदिवसीय ३५ रुपयांचा पास काढल्यास दिवसभरात शहरात कोठेही प्रवास करण्याची सवलत आहे. जोतिबा, पन्हाळा आणि राशिवडे या मार्गांवर हा पास लागू नव्हता. मात्र, आता दर रविवारी जोतिबावर विशेष बससेवेला हा पास लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना ३५ रुपयांचा पास एकदाच घेतल्यानंतर जोतिबा देवाच्या दर्शनासोबत शहरातील अनेक पे्रक्षणीय स्थळे केएमटी बसमधून पाहणे शक्य झाले आहे. यामुळे जोतिबा विशेष बससेवेला गर्दी होत आहे.

जोतिबा विशेष बससेवा

- दर रविवारी विशेष बस
- वेळ -सकाळी ६ ते सायंकाळी ७.४५ ( प्रतितासाच्या अंतराने)

तिकीट - मध्यवर्ती बसस्थानकापासून- प्रौढास २८, लहानास १४ रुपये
- ३५ रुपयांचा एकदिवसीय पास

मागील रविवारी (दि. १) लाभ घेतलेले प्रवासी - ३६१
उत्पन्न- ७ हजार ३४३
 

 

Web Title: KMT bus 'Phul' on Jotiba road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.