Kolhapur: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवपदी केशव जाधव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 11:54 IST2025-10-11T11:53:49+5:302025-10-11T11:54:09+5:30
प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे.

Kolhapur: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिवपदी केशव जाधव
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिवपदी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अवर सचिव केशव सदाशिव जाधव (मूळ कागल) यांची नियुक्ती झाली आहे. देवस्थान समितीवर सध्या प्रशासक असेल, तर सचिव नियुक्तीचे सर्वाधिकार त्यांच्याकडे असतात. सचिवपदी धर्मादाय कार्यालयातील वर्ग २ मधील अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा निकष असताना वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळेच सहा महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती.
देवस्थान समितीचे कामकाज सध्या प्रशासक जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सचिव शिवराज नाईकवाडे पाहत आहेत. मंदिर विकास आणि सुधारणांची कामे वेगाने केली जात आहेत. नियमाबाह्य, बेकायदेशीर कामांना फाटा देऊन सुरळीत कामकाज चालू असताना त्यात अडथळा आणला जात आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाने मार्चमध्ये मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांनी यासाठी अर्ज करावे, असे पत्र काढले होते. त्यावेळी मात्र नियमबाह्य असल्याचे लक्षात आले, तसेच यावर आक्षेप घेतला गेल्याने नियुक्तीची प्रक्रिया थांबवली गेली होती. शुक्रवारी मात्र हा आदेशच काढला गेला आहे. यावर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे.
शुक्रवारी सायंकाळी सचिव नियुक्तीचा आदेश काढला असून, त्यावर ज्या तारखेला पदावर रुजू होती, त्या तारखेपासून सेवेचा प्रारंभ आणि ज्या तारखेला ते आपल्या शासकीय पदाचा कार्यभार पुन्हा स्विकारतील, त्या तारखेला समाप्त होईल, त्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेशात म्हटले आहे.