Kolhapur flood: कोल्हापुरातील पाच रुग्णालयांना स्थलांतरचे आदेश, ३० निवारा केंद्रे स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:08 IST2025-08-21T16:08:24+5:302025-08-21T16:08:49+5:30
शहरात ४० नागरिकांचे स्थलांतर

Kolhapur flood: कोल्हापुरातील पाच रुग्णालयांना स्थलांतरचे आदेश, ३० निवारा केंद्रे स्थापन
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील पूरबाधित क्षेत्रातील पाच रुग्णालयांना रुग्ण स्थलांतरित करण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत.
नागाळा पार्क, महावीर कॉलेज परिसरातील डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, तसेच कदमवाडी येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटल या पाच रुग्णालयांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे या रुग्णालयापर्यंत पाणी आले होते. महापूर आल्यानंतर ऐनवेळी रुग्ण व रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली होती, तसेच महापालिका अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाला या नोटिसा दिल्या आहेत. प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी पंचगंगा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्या रुग्णालयांना निघाल्या नोटिसा..
डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, ॲपल सरस्वती हॉस्पिटल
शहरात ४० नागरिकांचे स्थलांतर, ३० निवारा केंद्रे स्थापन
कोल्हापूर : जिल्ह्यात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने संभाव्य महापूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी दसरा चौक येथील सुतारवाडा परिसरातील ४० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. या सर्वांची राहण्याची सोय चित्रदुर्ग मठात करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, एकूण ३० निवारा केंद्रे उभारण्यात आले असून, या ठिकाणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेवेची सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या सुविधांची पाहणी पाहणी करून योग्य सूचना दिल्या.
या निवारा केंद्रात आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी महापालिकेने दोन सहायक नियंत्रण अधिकारी आणि ३७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या आरोग्य पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, तर नोडल ऑफिसर म्हणून डॉ. अमोलकुमार माने काम पाहणार आहेत. आवश्यकतेनुसार सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडून इंटर्न डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार आहे.
गरोदर मातांची काळजी
विशेषतः गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना योग्य औषधोपचार देण्याची तर गंभीर स्थितीतील रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे व वॉर्ड दवाखान्यांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने निवारा छावण्यांमध्ये दैनंदिन आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. महापालिका भांडार विभागाकडून पर्याप्त औषधसाठा करून ठेवण्यात आला आहे.