कळंबा कारागृहात कैद्याला मारहाण
By Admin | Updated: July 11, 2014 00:41 IST2014-07-11T00:08:28+5:302014-07-11T00:41:24+5:30
अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याच्या रागातून कृत्य

कळंबा कारागृहात कैद्याला मारहाण
कोल्हापूर : पत्नीच्या हत्येप्रकरणी २००३ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून चार ते पाच कैद्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अनिल पवार (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. कैदी पवार हा कारागृह प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या विरोधात वारंवार तक्रारी करीत असे. त्यातून त्याला चार दिवसापुर्वी मारहाण झाली असल्याची चर्चा आहे. अनिल पवार हा पत्नीच्या हत्येप्रकरणी २००३ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहातच अभ्यास करून तो एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण करीत आहे. काही दिवसांपूर्वी चार ते पाच कैद्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो बेशुद्ध पडून त्याचा एक हात फ्रॅक्चर झाल्याने प्रशासनाने त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर वडील आजारी असल्याचे कारण सांगून कैदी पवार याची मुलगी प्रियांका हिला कोल्हापूरला बोलवून घेतले. तिने सीपीआरमध्ये येऊन वडील पवारकडे तब्येतीची विचारपूस केली असता त्याने आपणाला करागृहात इतर चार ते पाच कैद्यांनी मारहाण केली आहे. कारागृहातील काही अधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. मी आजारी पडल्याचे ते खोटे सांगत आहेत, असे सांगितले. हे ऐकून प्रियांकाला धक्काच बसला. तिने कारागृह अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. (प्रतिनिधी)