राजद्रोह गुन्ह्यातील शिवभक्तांना न्याय मिळावा, मराठा महासंघाची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 16:43 IST2022-01-15T16:42:26+5:302022-01-15T16:43:13+5:30
छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या ३८ मराठी तरुणांवर कन्नड प्रशासनाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

राजद्रोह गुन्ह्यातील शिवभक्तांना न्याय मिळावा, मराठा महासंघाची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी
कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या ३८ मराठी तरुणांवर कन्नड प्रशासनाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. हे तरुण गेले महिनाभर तुरुंगात खितपत पडले आहेत. या तरुणांना न्याय मिळावा, अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.
राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या या शिवभक्तांवर राजद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची कन्नड प्रशासनाची कृती शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोहोचवणारी आहे. कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार असून, आपण याप्रश्नी लक्ष घालून कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी व राजद्रोहाचा गुन्हा मागे घेण्याविषयी गांभीर्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र पाठवून आपल्या भावना कळवितो व प्रत्यक्ष फोनवरून संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, अवधूत पाटील आदींची उपस्थिती होती.