कळंबा तलाव ओव्हर फ्लो; जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:09 IST2020-10-15T19:07:37+5:302020-10-15T19:09:25+5:30
rain, dam, kalmba, kolhapurnews गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने उपनगरांसह लगतच्या गावात दाणादाण उडाली असून कळंबा तलाव यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे.

परतीच्या मुसळधार पावसाने यंदा प्रथमच कळंबा तलाव चौथ्यांदा सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला आहे.
कळंबा : गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने उपनगरांसह लगतच्या गावात दाणादाण उडाली असून कळंबा तलाव यंदा प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे.
गेल्या चार दिवसांपासून वरूणराजाने शहरासह उपनगरांनाही झोडपून काढले आहे. उपनगरांतील क्रशर चौक, पांडुरंग नगरीलगतचा चौक, देवकर पाणंद चौकात गुडघ्यावर पाणी साचले होते. त्यामुळे येथील वाहतूक काही काळ बंद होती. उपनगरांतील अनेक नाले तुडुंब भरून वाहत असल्याने बहुतांश प्रभागांतील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यात काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उपनगरांलगतच्या कळंबा, पाचगाव, जैताळ, हणबरवाडी, कंदलगाव, मोरेवाडीलगतच्या ग्रामीण भागातील मळणीची कामे खोळंबली तर काढणीला आलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.