Jyotiba Chaitra Yatra 2026: जोतिबाची उद्या चैत्र यात्रा; भाविकांच्या गर्दीने डोंगर फुलून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:51 IST2026-03-31T18:50:48+5:302026-03-31T18:51:39+5:30

गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण अन् 'चांगभलं'च्या गजरात यात्रेअधीचं भक्तिभावात डोंगर न्हाऊन गेला 

Jyotiba's Chaitra Yatra tomorrow; The mountains are filled with crowds of devotees | Jyotiba Chaitra Yatra 2026: जोतिबाची उद्या चैत्र यात्रा; भाविकांच्या गर्दीने डोंगर फुलून गेला

संग्रहित छाया

पोर्ले तर्फ ठाणे : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशसह कर्नाटकमधील लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा देवाची उद्या, बुधवारी (दि. १) वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा होत आहे. यात्रेसाठी गेल्या दोन दिवसांपासून जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल झाले आहेत. गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात यात्रेआधीच भक्तिभावात डोंगर न्हाऊन निघाला आहे.

बुधवारी (दि. ३१) मुख्य यात्रेदिवशी जोतिबा मंदिरात पहाटे ३ वाजेपासून धार्मिक विधींना प्रारंभ होईल. ५ वाजता पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल. सकाळी १० वाजता धुपारती सोहळा होईल. यात्रेचे मुख्य आकर्षण असणारी सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी १२ वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पूजनाने सुरू होईल.

या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी (जि. सातारा) या सासनकाठीचा आहे. त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या असतात. बुधवारी हस्त नक्षत्रावर सायंकाळी ५ वाजून ४५ वाजता जोतिबाचा पालखी सोहळा सुरू होईल.

तोफेच्या सलामीने पालखी जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होईल. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांचा विवाह सोहळा होईल. रात्री ८ वाजता जोतिबाची पालखी मंदिराकडे प्रस्थान होईल, ९ वाजता पालखी मंदिरातील सदरेवर विराजमान होईल. तोफेच्या सलामीने रात्री १० वाजता पालखी सोहळा पूर्ण होईल. आरती, अंगारा वाटप झाल्यानंतर रात्री ११ वाजता देव मूर्तीस शाही स्नान होईल. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहील.

भाविक मोठ्या संख्येने दाखल

यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. ‘चांगभलं’च्या गजराने डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खासगी वाहनांतून, पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर येत आहेत. बुधवारी मुख्य यात्रा झाली की भाविक परतीच्या मार्गाला लागतील.

सहजसेवाचे अन्नछत्र सुरू

गायमुख येथे सहजसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला सोमवारपासून प्रारंभ झाला. दूरवरचा प्रवास करून आलेल्या भाविकांना गरमागरम मसाले भात, आमटी, भाजी आणि चविष्ट शिरा, लोणचे असा आहार दिला जात आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता थंडगार मठ्ठा आणि थकवा घालवण्यासाठी चहाची अखंड सोय आहे. गुरुवारपर्यंत ही सेवा सुरू राहील.

Web Title : ज्योतिबा चैत्र यात्रा 2026: भव्य उत्सव के लिए भक्तों की भारी भीड़

Web Summary : ज्योतिबा की चैत्र यात्रा में लाखों श्रद्धालु जुटे। उत्सव में जुलूस, अनुष्ठान और देवताओं का विवाह शामिल हैं। भक्तों को भोजन और जलपान कराया जा रहा है। पहाड़ी भक्तिमय नारों से गुंजायमान है।

Web Title : Jyotiba Chaitra Yatra 2026: Devotees Throng Hill for Grand Celebration

Web Summary : Lakhs gather for Jyotiba's Chaitra Yatra. Festivities include processions, rituals, and a marriage ceremony of deities. Devotees are offered meals and refreshments. The hill is filled with chants and devotional fervor.