जोतिबा मंदिर, परिसर विकास प्राधिकरण स्थापन करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 14:01 IST2024-07-06T14:00:26+5:302024-07-06T14:01:07+5:30
आराखड्याचे आज सादरीकरण

जोतिबा मंदिर, परिसर विकास प्राधिकरण स्थापन करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील ज्योतिबा मंदिर विकासासाठी ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. १५३० कोटींच्या या आरखड्याचे आज शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर सादरीकरण होणार आहे.
कोल्हापूरची अंबाबाई व ज्योतिबा हे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक या देवस्थानांना भेट देतात. त्यांच्यासाठी सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने दोनही मंदिरांचे स्वतंत्र आराखडे तयार करण्यात आले असून, त्यांचे प्रस्ताव राज्य शासनाला सादर झाले आहेत. ज्योतिबा मंदिर व आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी नियोजित प्राधिकरणाची आवश्यकता आहे. त्यासाठी ज्योतिबा मंदिर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापन करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
ज्योतिबा मंदिर परिसर व आसपासच्या गावांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी एक वर्षापूर्वी जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर १५३० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात राज्य शासनाने काही त्रुटी काढल्या असून त्यामध्ये सुधारणा सुचवल्या आहेत. प्राधिकरणचे जिल्हास्तरीय समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. हा आराखडा आज शनिवारी जिल्हा नियाजेन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्र्यांसमोर सादर होणार आहे.
आराखड्यातील समाविष्ट बाबी
ज्योतिबा डोंगरासह खाली असलेल्या १८ गावांचा समावेश. मूळ मंदिराचे जतन संवर्धन, भक्तनिवास, पार्किंग, अन्नछत्र, रस्ते रुंदीकरण, जनसुविधा केंद्र.