ज्योतीच्या आयुष्याला मिळाला मंदारचा 'आधार'; कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात थाटामाटात पार पडला विवाह सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:53 IST2024-12-25T16:52:25+5:302024-12-25T16:53:13+5:30
कोल्हापूर : वार मंगळवार.. सायंकाळी पाचची वेळ.. बालकल्याण संकुलात लगबग सुरू झाली. संकुलाच्या दारात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या.. मांडव उभारला, हलगीच्या ...

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : वार मंगळवार.. सायंकाळी पाचची वेळ.. बालकल्याण संकुलात लगबग सुरू झाली. संकुलाच्या दारात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या.. मांडव उभारला, हलगीच्या तालावर बाल संकुलातील मुलांनी बेभान नृत्य सुरू केले. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरही हजर झाले. अंतरपाट धरला गेला, मंगलाष्टके सुरू झाली अन् अखेर बालकल्याण संकुलातील लाडकी सुकन्या ज्योती हिचा रुकडी(ता. हातकणंगले) येथील मंदार संजय खटावकर यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला. डॉ. रागिणी आणि डॉ. प्रवीण हेंद्रे यांनी कन्यादान केले.
या सोहळ्यासाठी बालकल्याण संकुलात जय्यत तयारी करण्यात आली होती. संजय आवळे यांच्या हलगी पथकाने सोहळ्याची रंगत वाढवली. सायंकाळी या सोहळ्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, पद्मजा तिवले, सुरेश शिपुरकर, नंदिनी पटोडिया, एस. एन. पाटील, व्यंकाप्पा भोसले, शिरीष बेरी, मानसी बेरी, सी. डी. तेली, लोकमतचे उपवृत्त संपादक विश्वास पाटील, डॉ. संदीप पाटील, पद्मजा गारे, ॲड. अश्विनी खाडे, ॲड. शिल्पा सुतार, दीपा शिपूरकर उपस्थित होते. जन्मापासून संस्थेत वाढलेल्या ज्योतीला निरोप देताना संकुलवासीयांचे डोळे पाणावले.
यांच्यामुळेच सोहळा बनला आनंदी
नीलेश चव्हाण (मांडव, विद्युत रोषणाई), भास्कर भोसले (स्टेज डेकोरेशन) स्वप्निल जठार (मंगळसूत्र), द्वारकादास श्यामकुमार कापड दुकान (लग्न बस्ता,राजाराणी कपाट), श्री कन्स्ट्रक्शनचे एस. एन. पाटील (कानातील टॉप्स), एस. व्ही. ज्वेलर्स (मनी मंगळसूत्र), नामिदेवी अनिल कश्यप (सागवानी बेड), आराम गादी कारखाना (गादी सेट), डॉ. प्रवीण आणि योगिता कोडोलीकर (वॉशिंग मशीन), सचिन ग्लास ट्रेडर्स, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि रणरागिनी ग्रुप (भांड्याचा सेट) , भारती मुद्रणालय (भांड्याचा सेट), किरण तिवले (पूजेचे साहित्य),
गुरुप्रसाद सासमिले, ॲड. अश्विनी खाडे (बांगड्या, मेहंदी कोन, नेलपेंट), राजगोंडा शेटे (मंडप सजावट साहित्य), शा.कृ.पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट (वधू-वर कपडे), अनुराधा पित्रे (मेकअप साहाय्य), नयना खत्री (पेढे), सोनाली निकम (प्रवासी बॅग, ड्रेस, पर्स), हरिप्रिया बॅग हाऊस व रूपाली फाटक (प्रवासी बॅग, बाऊल सेट), कुमार तोडकर (गजरे), नूपुर फुटवेअर (चप्पल), पुष्पक लेडीज वेअर, मोहिनी तोरस्कर व रेवती परब (कपडे), शिल्पा शहाजीराजे भोसले (पंजाबी ड्रेस), अविनाश भाले (स्वेटर, ब्लँकेट).