Joint pre-examination of MPSC postponed again | एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

ठळक मुद्देनवीन तारीख लवकर जाहीर करण्याची परीक्षार्थींची मागणी

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विविध पदांसाठी महाराष्ट्र राज्यसेवा लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी  (दि. ११) होणारी संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. चौथ्यांदा ही परीक्षा पुढे गेली आहे. कोल्हापूर केंद्रांवरून या परीक्षेसाठी १९,७७६ जणांनी नोंदणी केली होती. या परीक्षेची नवी तारीख राज्य शासनाने लवकर जाहीर करावी, अशी मागणी कोल्हापूरमधील परीक्षार्थींनी केली आहे.

पीएसआय, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालयीन सहाय्यक या पदांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिय गट ब संयुक्त पूर्व परीक्षा यापूर्वी तीनवेळा लांबणीवर पडली होती. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत एमपीएससीने ही परीक्षा आयोजित केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ५८ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने आणि शनिवारी, रविवारी विकेंड लॉकडाऊन असल्याने शासनाने ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी दुपारी जाहीर केला. कोरोनाबाबतची परिस्थिती पाहून या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.

परीक्षार्थी काय म्हणतात?


दीड वर्षांपूर्वी या परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे परीक्षा झाली असती, तर बरे झाले असते. लॉकडाऊनमध्ये मेन्सचा अभ्यास केला असता. या परीक्षेची नवी तारीख लवकर जाहीर करावी.
-शीतल पवार, नांगनूर.


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने परीक्षा पुढे ढकलली हे योग्य आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर केल्यास अभ्यासाचे नियोजन करता येईल.
-शुभम पाटील, फुलेवाडी

Web Title: Joint pre-examination of MPSC postponed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.