कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात ‘जनसुराज्य’ची पुन्हा एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:38 IST2025-12-19T12:36:08+5:302025-12-19T12:38:44+5:30
२००५ साली मर्यादित यश मिळाले होते. परंतु सई खराडे यांच्या रूपाने जनसुराज्यचा महापौर करण्याची संधी त्यांनी साधली.

कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात ‘जनसुराज्य’ची पुन्हा एन्ट्री
कोल्हापूर : महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार विनय कोरे यांचा ‘जनसुराज्य शक्ती’ पक्ष सक्रिय होणार आहे. या पक्षाचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी गुरुवारी काही कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली असून आज शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.
कदम यांनी गुरुवारी अमर बागी, महेश बराले यांच्याशी प्राथमिक चर्चा केली असून मंत्री पाटील यांच्याशी चर्चा करून कदम जागांचा प्रस्ताव ठेवणार आहेत. २००५ साली आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण ताकद लावली होती. त्यांना त्यावेळी मर्यादित यश मिळाले होते. परंतु सई खराडे यांच्या रूपाने जनसुराज्यचा महापौर करण्याची संधी त्यांनी साधली.
गेले सहा महिने महापालिकेबाबत चर्चा सुरू असताना कुठेही जनसुराज्यचा विषय पुढे आला नव्हता. परंतु महायुतीमधील शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी हाेत असताना त्याच्या बरोबर आदल्या दिवशी कदम यांनी कोल्हापुरात येऊन ही चर्चा सुरू केली आहे.
कोणाला किती जागा?
जनसुराज्य शक्ती जरी काही जागांची मागणी करणार असली तरी त्या कोणाच्या वाट्यातील द्यायच्या हा कळीचा मुद्दा पुढे येऊ शकतो. शिंदेसेना उमेदवारांबाबत फारच आग्रही असून आपल्या वाट्यातील जागा सोडण्यास पदाधिकाऱ्यांचा विरोध होणार आहे. त्यामुळे भाजपला पाठिंबा दिलेल्या जनसुराज्यसाठी भाजपला किंवा मैत्रीखातर राष्ट्रवादी काँग्रेसला जनसुराज्यसाठी काही जागा सोडाव्या लागतात का, हे पहावे लागणार आहे.