Kolhapur: जाजम, घड्याळ खरेदीचा ‘गोकुळ’कडे दुग्ध उपनिबंधकांनी मागितला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:29 IST2025-08-20T16:29:41+5:302025-08-20T16:29:56+5:30
विभागीय दुग्ध उपनिबंधकांचे पत्र : विना निविदा खरेदी संचालकांना भोवणार?

Kolhapur: जाजम, घड्याळ खरेदीचा ‘गोकुळ’कडे दुग्ध उपनिबंधकांनी मागितला खुलासा
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने विना निविदा सुमारे पावणेचार कोटी रुपयांचे जाजम व घड्याळ खरेदीबाबत वस्तूस्थितीपर खुलासा सादर करा, असे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी ‘गोकुळ’ प्रशासनाला दिले आहेत. आठ दिवसात हा खुलासा सादर करावा लागणार असून जाजम, घड्याळ खरेदी संचालकांना भोवण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’ दूध संघाने पाच महिन्यांपूर्वी हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त संलग्न प्राथमिक दूध संस्थांना जाजम व घड्याळ भेट दिली. साधारणत: पावणे चार कोटींची ही खरेदी आहे. संघाच्या पोटनियमानुसार तीन लाखापेक्षा अधिकची खरेदी करताना रीतसर जाहीर निविदा काढून स्पर्धेतून कमीत कमी दराने खरेदी करावी लागते. पण, खरेदीची प्रक्रिया न राबवता, केवळ कोटेशन घेऊन एवढी मोठी खरेदी केल्याचा आरोप पहिल्यांदा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला होता.
त्यानंतर, उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी या विषयाचा पाठपुरावा करत दुग्ध विभागाकडे तक्रार केली होती, त्याची दखल घेऊन विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी दूध संघाकडे खुलासा मागितला आहे. हा खुलासा आठ दिवसांत संघाला सादर करावा लागणार आहे.
संचालक मंडळ बरखास्त करा, उद्धवसेनेची मागणी; पोटनियमाला हरताळ फासल्याचा आरोप
कोल्हापूर : ‘गोकुळ’ने दूध संस्थांना वाटप केलेल्या घड्याळ, जाजमाची खरेदी बेकायदेशीर केली असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घामाची लूट केल्याचा आरोप करत संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने मंगळवारी दुग्ध विभागाकडे केली.
उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, पहाटेपासून गोठ्यात जनावरांसारखे राबून प्रसंगी आपल्या मुलाबाळाच्या तोंडावर मारून शेतकरी ‘गोकुळ’ला दूध पाठवतो. मात्र, ही मंडळी मिळेल त्या ठिकाणी डल्ला मारत सुटली आहेत. जाजम, घड्याळ खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गोलमाल झाला असून, याला संचालकांसह कार्यकारी संचालक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करा.
उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, सहकार कायद्यानुसार तीन लाखांपेक्षा अधिकच खरेदी खुल्या निविदा काढूनच करावी लागते. केवळ कोटेशनवर खरेदी करून संचालकांनी पोटनियमाला हरताळ फासल्याने त्यांच्यावर कारवाई करा.
मागणीचे निवेदन सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांना दिले. यावेळी विभागीय उपनिंबधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संजय पवार यांनी चर्चा केली. संघाकडून याबाबत खुलासा मागितला आहे, चुकीचे केले असेल तर निश्चित कारवाई करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, तालुकाप्रमुख तानाजी आंग्रे, प्रतिज्ञा उत्तुरे, शशी बीडकर, आदी उपस्थित होते.
खरेदी माहिती लपविणे हाच पुरावा
संघाच्या पोटनियमानुसारच जाजम व घड्याळ खरेदी केल्याचे ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सांगितले होते. तसे लेखी मागणी करूनही त्यांनी दिली नाही. खरेदीची माहिती लपवणे हाच बेकायदेशीर खरेदीचा पुरावा असल्याचे संजय पवार यांनी सांगितले.
..तर आणखी एक याचिका दाखल करू
‘गोकुळ’च्या कारभाराविरोधात सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी एक याचिका दाखल झाली आहे. जाजम व घड्याळ खरेदीबाबत संबंधितांकडून पैसे वसूल केले नाहीतर आणखी एक याचिका दाखल करू, असा इशारा संजय पवार यांनी दिला.
जाजम मखमली आहे का?
‘गोकुळ’ने ५४०० दूध संस्थांना तीन कोटी ७५ लाख रुपये किमतीचे जाजम, घड्याळे दिली. प्रती संस्था सात हजार रुपये खर्च दाखवला आहे. पाचशे रुपये घड्याळाची किंमत गृहीत धरली तर जाजमाची किंमत साडेसहा हजार कशी? हा जाजम मखमली आहे का? अशी विचारणा विजय देवणे यांनी केली.