Maharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 11:05 IST2019-08-14T10:56:21+5:302019-08-14T11:05:22+5:30
४२ पथके कोल्हापूरसाठी सज्ज; घरांच्या डागडुजीसह मोडलेले संसार उभारण्याचा प्रयत्न

Maharashtra Flood: शाब्बास पोरांनो... आयटीआयचे विद्यार्थी दूर करताहेत पूरग्रस्तांच्या घरातील अंधार!
मुंबई : राज्यातील पूरस्थिती पाहता राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आता तिथे गरज आहे ती मोडून पडलेले संसार सावरण्याची, घरांची डागडुजी करण्याची. यासाठी आयटीआयच्या विद्यार्थी-प्राचार्यांची पथके सज्ज आहेत. राज्यभरातून ४२ पथके तयार असून जिल्हा आपत्ती अधिकाऱ्यांकडून सूचना मिळताच आवश्यक तेथे जाणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे मुंबई विभागाचे साहाय्य्क संचालक योगेश पाटील यांनी दिली.
अनेक पूरग्रस्त जिल्ह्यांतील घरांत एमएसईबीचे कर्मचारी वीज आहे की नाही? मीटर चेकिंग यांसारखी कामे करत आहेत. आयटीआयचे विद्यार्थी, प्राचार्य त्यांना या कामात मदत करीत आहेत. सांगलीवाडी, शिराळे, पलूस, मीरज येथे आयटीआय विद्यार्थ्यांचे पथक पोहोचले आहे. तेथील घरांतील मीटर रिप्लेसमेंट, वायर चेकिंग, लिकेजेस यांची तपासणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी एमएसईबी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. वैद्यकीय, इतर कॅम्पमध्येसुद्धा मदतीसाठी विद्यार्थी तयार असल्याची माहिती सांगली आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी दिली.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरआयटीआयची ५ पथके, पुणे येथील औंधची ३, मुंबई विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडची प्रत्येकी २, नाशिकमधून ८, नागपूर, अमरावतीची प्रत्येकी ३ तर औरंगाबादची ८ पथके तयार असल्याची माहिती योगेश पाटील यांनी दिली. या प्रत्येक पथकात १५ ते १६ विद्यार्थी आणि प्राचार्य यांचा सहभाग आहे. या पथकांतील विद्यार्थी हे इलेक्ट्रिशियन, वायरमन, प्लंबर, फिटर, वेल्डर, कारपेंटर आहेत. यातील काही विद्यार्थी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत तर काही माजी विद्यार्थ्यांनी संचालनालयाच्या सांगण्यावरून मदतीसाठी तयारी दाखविली असल्याचे पाटील यांनी सांगितले.