सरकारचे साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:16 IST2019-02-09T05:16:30+5:302019-02-09T05:16:46+5:30
देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे.

सरकारचे साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण
- चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर - देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, हंगामातील पहिल्या चार महिन्यांत केवळ ११ लाख टन साखर निर्यातीच्या वाटेवर असून, यातील ६ लाख ६८ हजार टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेच्या दरांतील तफावतीमुळे निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
आतापर्यंत कारखान्यांनी सुमारे १५ लाख टनांपर्यंत निर्यातीचे करार केले आहेत. त्यातील ११ लाख ३ हजार ६३१ टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे. यातील ६ लाख ६८ हजार ६८० टनच निर्यात झाली आहे. उर्वरित ४ लाख ३४ हजार ९५१ टन साखर निर्यातीच्या वाटेवर म्हणजेच जहाजात किंवा बंदरात आहे. यातील ४ लाख ६३ हजार टन साखर गेल्या महिन्यात निर्यात झाल्याचे आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने कळविले आहे.
देशात सध्या २९२ लाख टन साखर उपलब्ध असून आणखी १२५ टन उत्पादन अपेक्षित आहे. देशाच्या गरजेपेक्षा सुमारे १४० टनांहून अधिक साठी असल्याने केंद्राने निर्यातीची सक्ती कारखान्यांना केली आहे. मात्र,देशांतर्गत दरापेक्षा २०० ते ३०० रुपये कमी मिळत असल्याने कारखाने निर्यातीला फारसे उत्सुक नाहीत.
३ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा
शेतकऱ्यांच्या ऊस बिलापोटी देय एफआरपीची रक्कम थकविल्याप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अहमदनगर जिल्ह्यातील ३ साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटीसा पाठविल्या आहेत. त्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या राहुरी येथील तनपुरे व राहाता तालुक्यातील गणेश हे दोन सहकारी आणि जामखेड येथील जय श्रीराम शुगर अॅण्ड अॅग्रो लि. या खासगी कारखान्याचा समावेश आहे.