शाब्बास!, शिष्यवृत्तीत कोल्हापूर राज्यात भारी; ईश्वरी कोटकर, नुपूर पोवारने पटकावला प्रथम क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 19:05 IST2025-07-11T19:04:57+5:302025-07-11T19:05:18+5:30
उज्ज्वल परंपरा कायम

शाब्बास!, शिष्यवृत्तीत कोल्हापूर राज्यात भारी; ईश्वरी कोटकर, नुपूर पोवारने पटकावला प्रथम क्रमांक
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली. या दोन्ही गटांमध्ये राज्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी अधिक आहे.
पाचवी ग्रामीणमध्ये भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर सोनाळीची विद्यार्थिनी ईश्वरी दिग्विजय कोटकर आणि आठवी ग्रामीणमध्ये राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील श्री नामदेवराव भोईटे विद्यालयाची विद्यार्थिनी नुपूर युवराज पोवार या दोघींनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला. राज्य यादीतील २७ पैकी तब्बल २४ विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत.
राज्यस्तरीय गुणवत्तायादीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या ४२२ असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ८० म्हणजे १९ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी आणि हातकणंगले तालुक्यांतील विद्यार्थी तुलनेत अधिक उत्तीर्ण झाले आहेत. पाचवीची राज्याची टक्केवारी २३.९० टक्के असून, कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी ३६.१० टक्के आहे.
आठवीची राज्याची टक्केवारी १९.३० टक्के असून, कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी ३५.८५ टक्के इतकी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. मीना शेंडकर यांनी अभिनंदन केले आहे.
पाचवी ग्रामीण राज्य यादी
- सौरभी सूर्यकांत डवर, केंद्रशाळा फेजिवडे, ता. राधानगरी (दुसरी)
- श्लोक शशिकांत पाटील, विठ्ठल विद्यामंदिर पेद्रेवाडी, ता. आजरा (तिसरा)
- स्वरा आदेश सापळे, विद्यामंदिर सोनाळी, ता. भुदरगड (तिसरी)
- आदित्य दिगंबर मिसाळ, केंद्रशाळा पिंपळगाव, ता. भुदरगड (सहावी)
- श्रीष मनोहर मासूरकर, वि.मं. माडवळे, ता. चंदगड (सहावा)
आठवी ग्रामीण राज्य यादी
- पार्थ चंद्रकांत पाटील, कुमार भवन पुष्पनगर, ता. भुदरगड (तिसरा)
- अंजली बाबासो. पाटील, छत्रपती शिवाजी हायस्कूल, पन्हाळा (चौथी)
- यश लक्ष्मण पाटील, छत्रपती शिवाजी हायस्कूल, तिरवडे, ता. भुदरगड (सातवा)
- पार्थ बजरंग व्हरकट, कुमार भवन, पुष्पनगर, ता. भुदरगड (सातवा)
- अविष्कार मुकुंद माळी, दत्ताजीराव कदम हायस्कूल, शिरोळ (सातवा)
इयत्ता आठवी शहरी राज्य यादी
- श्रुती अमित पुंडपळ, व्यंकटराव हायस्कूल, आजरा (दुसरी)
- श्वेतल सुनील बंडगर, डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल, इचलकरंजी (आठवी)
- विवेक धनाजी पाटील, व्यंकटराव हायस्कूल, आजरा (आठवा)
- स्वराज्य प्रवीण निंबाळकर, व्यंकटराव हायस्कूल, आजरा (आठवा)
- संस्कृती संतोष आवळे, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, इचलकरंजी (दहावी)