Kolhapur Crime: थांबा..!, अजून तपास सुरु आहे; फिर्यादींची चिंता वाढली
By उद्धव गोडसे | Updated: April 16, 2025 18:35 IST2025-04-16T18:35:38+5:302025-04-16T18:35:56+5:30
उद्धव गोडसे कोल्हापूर : घरफोड्या, चेन स्नेचिंग, बनावट नोटा, अवैध गर्भलिंग तपासणी, गर्भपात, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची ...

Kolhapur Crime: थांबा..!, अजून तपास सुरु आहे; फिर्यादींची चिंता वाढली
उद्धव गोडसे
कोल्हापूर : घरफोड्या, चेन स्नेचिंग, बनावट नोटा, अवैध गर्भलिंग तपासणी, गर्भपात, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या वर्षभरापासून केवळ तपास सुरू असल्याची उत्तरे पोलिसांकडून फिर्यादींना मिळतात. यामुळे चोरटे मोकाट असून, गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. रखडलेल्या तपासांना गती कधी येणार? असा सवाल फिर्यादींकडून उपस्थित केला जात आहे.
या गुन्ह्यांचा तपास रखडला
करवीर : बनावट नोटा, बोगस खते, कळंबा येथील अवैध गर्भलिंग निदान, फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावे माने दाम्पत्याने केलेली एक कोटी ६७ हजारांची फसवणूक, मांढरे येथील विषबाधा यासह काही घरफोड्यांचा तपास रखडला आहे. घरफोड्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
शाहूपुरी : मध्यवर्ती बसस्थानकातून सराफाच्या दागिन्यांची झालेली चोरी, नागाळा पार्कातील अल्पवयीन मुलीला फूस लावून लुबाडलेले ५२ तोळे दागिने, रुक्मिणीनगर येथील घरफोडी, नागाळा पार्क येथील वाहनांच्या काचा फोडून लांबवलेली रोकड या गुन्ह्यांचा तपास रखडला आहे. जिल्हा परिषदेच्या बनावट धनादेश गुन्ह्यातील एक संशयित पोलिसांच्या हाती लागला असून, इतरांचा शोध सुरू आहे.
जुना राजवाडा : भानामती केल्याची भीती घालून गंगावेश येथील वृद्धाची लूट करणारे प्रमुख आरोपी अद्याप पसार आहेत. रंकाळा परिसरातील चेन स्नेचिंग आणि एका घरफोडीचा अद्याप उलगडा झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांत चोरीतील २३ पैकी केवळ ५ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
लक्ष्मीपुरी, राजारामपुरी : या दोन्ही पोलिस ठाण्यात गेल्या तीन महिन्यांत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या २९ पैकी २७ गुन्ह्यांची उकल झाली, तर राजारामपुरी पोलिसांनी ४५ पैकी ४२ गुन्ह्यांचा छडा लावला. घरफोडी, खंडणी आणि फसवणुकीच्या जुन्या गुन्ह्यांचे तपास मात्र अजूनही सुरूच आहेत.
एकाच चोरट्याकडून १४ गुन्ह्यांचा उलगडा
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या आठवड्यात कसबा बावड्यातील एका चोरट्याला पकडले. त्याच्या चौकशीत १४ घरफोड्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. मंगल कार्यालयातील समारंभांमध्ये चोऱ्या करणाऱ्या तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल झाली.
फिर्यादींची चिंता वाढली
घरफोड्या आणि वाहन चोरीतील फिर्यादी रोज पोलिस ठाण्यांमध्ये चकरा मारून तपासाबद्दल विचारणा करतात. मात्र, चोरटा सापडला नसल्याचे सांगून पोलिस त्यांना परत पाठवतात. घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने फिर्यादींची चिंता वाढली आहे.
तीन महिन्यांतील गुन्हे आणि तपास
पोलिस ठाणे - दाखल - उकल
शाहूपुरी - १०७ - ६५
जुना राजवाडा - ६५ - ४५
राजारामपुरी - ४५ - ४२
लक्ष्मीपुरी - २९ - २७