Kolhapur Crime: 'एएस ट्रेडर्स'च्या तपासाचे गौडबंगाल; मेकर, क्रिप्टो करन्सीसह एकूण २० गुन्ह्यांमध्ये सव्वाशे कोटींची फसवणूक
By उद्धव गोडसे | Updated: February 4, 2025 18:43 IST2025-02-04T18:42:45+5:302025-02-04T18:43:16+5:30
तपासांचे पुढे काय झाले? असा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे

Kolhapur Crime: 'एएस ट्रेडर्स'च्या तपासाचे गौडबंगाल; मेकर, क्रिप्टो करन्सीसह एकूण २० गुन्ह्यांमध्ये सव्वाशे कोटींची फसवणूक
उद्धव गोडसे
कोल्हापूर : मोठ्या फसवणुकीचे गुन्हे तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवले जातात. गेल्या दोन वर्षांत आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून २० गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. यातील अटक केलेल्या १३० पैकी ७० आरोपींवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. मात्र, एएस ट्रेडर्स, धनशांती, क्रिप्टो करन्सी, शासकीय जमीन खरेदी-विक्री घोटाळा, अशा महत्त्वाच्या अनेक गुन्ह्यांच्या तपासाला अपेक्षित गती नाही. त्यामुळे या तपासांचे पुढे काय झाले? असा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक बोगस कंपन्यांनी लोकांना गंडा घातला. क्रिप्टो करन्सी, बिटकॉईन, कमी व्याज दरात कर्ज देणे, शासकीय जमीन नावावर करून देण्याच्या बहाण्याने अनेकांनी फसवणूक केली. गेल्या दोन-तीन वर्षांत फसवणुकीची मालिकाच सुरू होती. २०२३ मध्ये जिल्ह्यात फसवणुकीचे १३५९ गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये ही संख्या २०१ पर्यंत खाली आली.
दोन वर्षांतील प्रमुख २० गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. यात शेअर ट्रेंडिग, क्रिप्टो करन्सी, एकच मिळकत अनेकांना विकणे, शासकीय जमीन स्वत:च्या नावावर करून घेऊन शासनाची फसवणूक करणे, इचलकरंजीतील कापड व्यवहारात झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
एएसमधील काही आरोपी मोकाटच
एएस ट्रेडर्ससह इतर महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास अजूनही सुरूच आहे. यातील काही आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. एएस ट्रेडर्स फसवणुकीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. यात एकूण ३४ आरोपी निष्पन्न झाले आहेत. प्रमुख सूत्रधार लोहिसतिंग सुभेदार याच्यासह २३ संशयितांना अटक झाली आहे. अटकेतील सर्व संशयितांवर आरोपपत्र दाखल केले असून, सुमारे चार कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सव्वाशे कोटींची फसवणूक
एकूण २० गुन्ह्यांमध्ये १२५ कोटी ६८ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यांमध्ये सुमारे १५० संशयित आरोपींचा समावेश आहे. यातील १३० जणांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी ७० जणांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. उर्वरित संशयितांवर पुरवणी आरोपपत्र दाखल केली जात आहेत.
या गुन्ह्यांचा तपास सुरू
गुन्हा - फसवणूक रक्कम - निष्पन्न आरोपी
एएस ट्रेडर्स - २३ कोटी - ३४
वेल्थ शेअर - २५ ते ३० कोटी - ५
धनशांती ट्रेडर्स - २ कोटी ८० लाख - ५
मेकर ॲग्रो - २६ कोटी - २३
क्रिप्टो करन्सी (जीडीसीसी) - १२ कोटी ३८ लाख - १७
क्रिप्टो करन्सी - १३ कोटी ९२ लाख - ६
बोगस फ्लॅट विक्री - ११ कोटी - ५३