कोल्हापूर : कसबा बावडा येथील ड्रेनेज घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला. या अहवालात कोणते निष्कर्ष काढण्यात आले आहेत, त्यामध्ये कोण कोण दोषी आहेत हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.कसबा बावडा येथील ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम पूर्ण न करताच ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांने ७२ लाखांचे बिल उचलल्याचा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केला होता. या आरोपामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. कदम यांनी प्रशासकांना पत्र देऊन या घोटाळ्याची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांची चौकशी समिती स्थापन करून ४८ तासांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते.दरेकर व मस्कर यांची गेल्या काही दिवसांपासून याची चौकशी करून त्याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्रशासकांना सादर केला. या अहवालात झालेले काम, न झालेले काम, ठेकेदाराने उचललेले बिल, अधिकाऱ्यांच्या सह्या, ऑनलाइन बिलासाठीची प्रक्रिया या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. अहवालात ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.याबाबत प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अहवाल सायंकाळी उशिरा माझ्याकडे आला आहे. परंतु, सार्वजनिक गणेशोत्सवाची बैठक असल्याने तो पाहता आलेला नाही. आज, शुक्रवारी तो तपासून पुढील निर्णय घेतला जाईल.चौकशीचा अहवाल आणि त्यावर प्रशासक काय कारवाई करणार याकडे संपूर्ण महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. चौकशी पूर्ण होण्याआधीच प्रशासकांनी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे पुढील कारवाई कशा प्रकारची असणार आणि ही कारवाई कोणाकोणावर होणार याबाबत उत्सुकता आहे.
विधिज्ञांचे मत घेण्याची शक्यताचौकशी अहवाल मिळाल्यामुळे आता त्यावर विधिज्ञांचे मत घेणे महत्त्वाचे आहे. यातील काही अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई करता येईल, याचा अभिप्राय घेतला जाण्याची शक्यता आहे.