खासगी अवैध सावकारांची तपासणी करून कारवाई करा : गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 13:03 IST2020-10-24T12:54:35+5:302020-10-24T13:03:18+5:30
Money, Shambhuraj Desai, collector, kolhapur , Police अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होणार हे गृहीत धरून जिल्ह्यातील खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम तातडीने राबवा, दोषींवर कडक कारवाई करा, अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पोलिसांना दिल्या. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री देसाई यांनी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
कोल्हापूर: अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक होणार हे गृहीत धरून जिल्ह्यातील खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम तातडीने राबवा, दोषींवर कडक कारवाई करा, अशा सक्त सूचना गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पोलिसांना दिल्या. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री देसाई यांनी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड, उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, श्रीमती पी. एस. कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्री देसाई यांनी सावकारांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने विशेष जागरुक राहावे असे सांगितले.
यावर्षी कोरोना, महापूर आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन खासगी अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी पोलीस विभागाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे मंत्री देसाई यांनी सांगितले.
महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करा
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आणि गुन्ह्यांचे उकल होण्याच्या वाढत्या प्रमाणाबद्दल समाधान व्यक्त करून देसाई यांनी दिशा कायद्यासाठी राज्य शासन संवेदनशील आहे. महिलांना सार्वत्रिक ठिकाणी वावरताना सुरक्षित वाटले पाहिजे, असे वातावरण निर्माण करावे असे सांगितले.
पोलीस वसाहतीसाठी लवकरच निधी
पोलिसांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांना चांगली वाहने मिळावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागात पोलीस ठाण्यापासून जवळच पोलिसांना राहता यावे यासाठी पोलीस वसाहतीसाठी प्रस्ताव पाठवावेत. पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.