आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचा शरद पवार यांना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:53 IST2023-07-14T13:51:47+5:302023-07-14T13:53:16+5:30
‘अमृत’ महामंडळाच्या स्थापनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही केले नाही

आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचा शरद पवार यांना पाठिंबा
कोल्हापूर : माजी मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्राह्मण समाजासाठी ‘अमृत’ महामंडळाची स्थापना केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद शरद पवार यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा मकरंद कुलकर्णी व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
मकरंद कुलकर्णी म्हणाले, २०१९ साली आम्ही मुंबईत आंदोलन करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. परंतु त्यांनी काहीही केले नाही. यानंतर २२ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानुसार महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘अमृत’ महामंडळाची स्थापना करण्यात आली. आम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत काम करत असल्याने भाजपमधील बुद्धिवादी लोक आम्हाला हिणवत होते. आता भाजप आणि राष्ट्रवादीने गळ्यात गळे घातल्यानंतर त्यांना जाब विचारण्याची, खडे बोल सुनावण्याची तयारी हे लोक दाखवतील काय.
जो राजकीय पक्ष ब्राह्मण समाजाचे काम करेल त्याच्यासोबत राहण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे यापुढच्या काळात शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आम्ही राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पाठिंबा पत्रावर मकरंद कुलकर्णी, सूरज कुलकर्णी, अॅड. विजय जमदग्नी, प्रदीप अष्टेकर, स्वानंद गोसावी, अजित देशपांडे, केदार कानिटकर, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे यांच्या सह्या आहेत.