Kolhapur: अणदुरातील फार्महाऊस, रिसॉर्टची तपासणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:15 IST2025-05-08T18:14:06+5:302025-05-08T18:15:01+5:30
पाणी संचय पातळीतील बांधकामे तातडीने हटवण्याच्या सूचना

Kolhapur: अणदुरातील फार्महाऊस, रिसॉर्टची तपासणी सुरू
कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने जलाशयांच्या शेजारी असलेले फार्महाऊस, रिसॉर्ट आणि हॉटेल्सची तपासणी सुरू केली. अणदूर धरण परिसरातील ४० फार्महाऊसची तपासणी पूर्ण झाली असून, यात चार ठिकाणी पाणी संचय पातळीलगत अनधिकृत बांधकामे केल्याचे आढळले. बेकायदेशीर बांधकामे तातडीने काढण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. तसेच जलाशयात बोट आणि तराफे फिरवणाऱ्या फार्महाऊस धारकांना अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील धरणे आणि तलावांच्या शेजारी वाढलेले अतिक्रमण, जलाशयांच्या सुरक्षेवर 'लोकमत'ने प्रश्न उपस्थित करताच पाटबंधारे विभागाने सर्व जलाशयांशेजारी असलेले हॉटेल्स, फार्महाऊस मालकांना नोटिसा पाठवल्या होत्या. त्यानंतर तातडीने बांधकामांची तपासणी सुरू केली आहे. पाटबंधारे विभागाच्या कळे येथील शाखा अभियंत्यांनी अणदूर येथील ४० फार्महाऊसची तपासणी केली.
बांधकामाला परवानगी घेतली आहे काय? सांडपणी आणि कचऱ्याचे काय नियोजन केले आहे? पाणलोट क्षेत्राची नासधूस केली आहे काय? जलाशयातून पाणी उपसा करण्याची परवानगी घेतली आहे काय? पाटबंधारे विभागाच्या हद्दीत बांधकामे केली आहेत काय? याची तपासणी अभियंता अजिंक्य पाटील यांच्या पथकाने केली. जिल्ह्यातील सर्वच धरणे आणि तलावांशेजारी असलेल्या बांधकामांची चौकशी आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चार ठिकाणी अनधिकृत बांधकामे
अणदूर धरणालगत पाणी संचय पातळीमध्ये चार ठिकाणी बोटी लावण्यासाठी बांधकाम केल्याचे तपासणीत निदर्शनास आले. याबाबत फार्महाऊस मालकांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित बांधकाम आपले नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यात उतरण्याची परवानगी नसताना बोटी कशासाठी घेतल्या आहेत? अशी विचारणा करताच ते अनुत्तरीत झाले.
सूचना फलक लावणार
धरणांमध्ये बोटिंग करण्यास परवानगी नसल्याचे आणि निषिद्ध क्षेत्राचे सूचना फलक पाटबंधारे विभागाने तयार केले आहेत. चार दिवसांत कळे विभागातील सर्व जलाशयांवर सूचना फलक लावणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांना गस्त घालण्याचे आवाहन
अणदूर धरणात एक पर्यटक बुडून दुर्घटना झाल्यानंतरही जलाशयांवर पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. पुन्हा दुर्घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी. सुट्यांच्या काळात नियमित गस्त ठेवावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.