Shahu Maharaj Jayanti लखनौ राजभवनात शाहू जयंती, राज्यपाल राम नाईक यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:04 IST2018-06-27T18:59:08+5:302018-06-27T19:04:34+5:30
राजर्षी शाहू महाराज दूरदर्शी असल्यानेच त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर भर दिला. आज कोल्हापुरात सगळ्यात जास्त शिक्षित लोकसंख्या आहे. प्रत्येक मोठ्या व्यावसायिक ब्रँडचे लाँचिंग कोल्हापुरात होते ही शाहंूच्या दूरदृष्टीची निशाणी आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांचे अनुकरण केले पाहिजे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे राजभवनात केले.

लखनौमध्ये मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने आयोजित शाहू जयंती समारंभात साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या वीस पुस्तकांचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज दूरदर्शी असल्यानेच त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर भर दिला. आज कोल्हापुरात सगळ्यात जास्त शिक्षित लोकसंख्या आहे. प्रत्येक मोठ्या व्यावसायिक ब्रँडचे लाँचिंग कोल्हापुरात होते ही शाहंूच्या दूरदृष्टीची निशाणी आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांचे अनुकरण केले पाहिजे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे राजभवनात केले.
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या पुढाकारातून आयोजित शाहू जयंती समारंभात मंगळवारी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल नाईक यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल प्रमुख उपस्थित होत्या. किंग जॉर्ज आरोग्य विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. लवटे यांच्या २० पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. लवटे म्हणाले,‘विसाव्या शतकाच्या प्रारंभी शाहू महाराजांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने हॉस्टेलची स्थापना केली. संस्थानात ५० टक्के आरक्षण लागू करून दलितांना मुख्य प्रवाहात आणून सामाजिक क्रांतीचे नवे पर्व सुरू केले.
शाहूंनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. ‘मुलं आई-बापाची असली तरी प्रजा माझी आहे’ हा स्वच्छ हेतू त्यामागे होता. चार वर्षांनंतर आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार आहोत. राजर्षी शाहूंचा मृत्यू सन १९२२ ला झाला. त्यामुळे हे वर्ष राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती वर्ष म्हणून साजरे झाले पाहिजे. या दोन्ही घटना आपल्या देशासाठी महत्त्वाच्या आणि प्रासंगिक आहेत.’
राज्यपाल नाईक म्हणाले, ‘कानपूरमध्ये सन १९१९ मध्ये झालेल्या कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी दिली. पुढील दोन वर्षांत या घटनेला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कानपूर अधिवेशनाच्या स्मृतींचा भव्य समारंभ आयोजित केला जावा.
यावेळी कामगारमंत्री स्वामी प्रसाद मौर्य, राज्यमंत्री जयकुमार सिंह जैकी, कुलगुरू श्रृती सडोलीकर, कुलपती नीलिमा गुप्ता, संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पटेल, प्रो. एस. एन. कुरील आदी उपस्थित होते.
भाग्य असेही..
माझं बालपण अनाथाश्रमात गेले. आयुष्यभर मानवतेला जात आणि धर्म मानले. आज माझ्या २० पुस्तकांचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण झाले. हा मानवतेचा विजय आहे. स्वातंत्र्यानंतरही आपण अजूनही मतभेदांनी घेरलो गेलो आहोत. विविधता हीच आपली ओळख आहे. ती कायम ठेवून आपण विकासाकडे पावले टाकली पाहिजेत, असेही लवटे यांनी सांगितले.