बनावट दस्ताऐवजाद्वारे तीन मिळकतींवर चढवली वारसा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 15:25 IST2021-01-28T15:23:32+5:302021-01-28T15:25:19+5:30
Fraud Crimenews Kolhapur- मृताची आपण पत्नी असून, दोन अपत्य असल्याबद्दलचे बनावट दस्ताऐवज तयार करून मिळकतीवर नावे नोंदविल्याप्रकरणी महिलेसह पाच जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

बनावट दस्ताऐवजाद्वारे तीन मिळकतींवर चढवली वारसा नोंद
कोल्हापूर : मृताची आपण पत्नी असून, दोन अपत्य असल्याबद्दलचे बनावट दस्ताऐवज तयार करून मिळकतीवर नावे नोंदविल्याप्रकरणी महिलेसह पाच जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका मसाला व्यावसायिककडे एक महिला नोकरीस होती. तिचा यापूर्वीच विवाह झाला होता. तिला दोन मुलेही आहेत. २००३ मध्ये संबंधित व्यावसायिकाचा मृत्यू झाला. त्यांना भाऊ बहिणीशिवाय इतर थेट वारस नाहीत. तसेच त्यांनी मिळकतीबाबत कोणतेही मृत्युपत्र अगर दस्त तयार करून ठेवले नव्हते.
अशी परिस्थिती असतानाही संबंधित नोकरीस असणाऱ्या महिलेने आपणच त्या मृत मसाला व्यावसायिकाची पत्नी असून, आम्हाला दोन अपत्य आहेत. असे बनावट दस्त तयार करून घेतला तसेच आपणच त्यांची सरळ वारस असल्याचे प्रशासनास भासवले. त्याआधारे व्यावसायिकाने स्वकष्टाने मिळवलेल्या सागरमाळ, महालक्ष्मी चेंबर्स, लक्ष्मीपुरी अशा तीन मिळकतीवर आपली नावे नोंदवून फसवणूक केली.
हा प्रकार २००३ ते २०२१ या दरम्यान घडला. अशी तक्रार मृत व्यावसायिकांचा नातेवाईक प्रफुल्लचंद परमानंद हळदणकर (वय ४७, रा. महालक्ष्मीनगर, मंगळवार पेठ) यांनी दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलिसात ठाण्यात पाच संशयितावर गुन्हा दाखल झाला.