कोल्हापुरात गुंतवणुकीसाठी इंडोनेशिया तयार, स्थानिक उत्पादनांना मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:04 IST2025-09-20T16:03:39+5:302025-09-20T16:04:31+5:30
कोल्हापूर : येथील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील स्थिती मजबूत असून येथील उत्पादने दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ...

कोल्हापुरात गुंतवणुकीसाठी इंडोनेशिया तयार, स्थानिक उत्पादनांना मोठी संधी
कोल्हापूर : येथील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील स्थिती मजबूत असून येथील उत्पादने दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह कोल्हापुरातील उद्योगांसोबत व्यावसायिक भागीदारी करण्यास व गुंतवणुकीसाठीही आम्ही तयार आहोत, अशी जाहीर ऑफर इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वर्दोया यांनी शुक्रवारी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरच्या पुढाकाराने उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्या झंवर सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी इंडोनेशिया कौन्सिलेट वाणिज्य विभागाचे एको जुनोर, अधिकारी डायन हयाती सॅम्स्यूवीर किबे, प्रशासन विभागाचे मुस्तफा अन्सारी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.
एडी वर्दोया म्हणाले, “कोल्हापुरातील उद्योजकांनी आपल्या उद्योगाची नोंदणी इंडोनेशिया कौन्सिलेटच्या चेन्नई येथील उद्योग विभागाकडे करावी. यामुळे तुमच्या उत्पादनांची माहिती इंडोनेशियातील व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत थेट पोहोचेल. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून भागीदारीसाठी इच्छुक उद्योजकांशी आम्ही चर्चा करू आणि पुढील दिशा निश्चित करू.”
ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर आंतरराष्ट्रीय व्यापार-उद्योग संबंध वृद्धीवर लक्ष केंद्रित करून कार्यरत आहे. इंडोनेशियातील व्यापाऱ्यांना ॲटो पार्ट्स, प्रिसिजन इंजिनीअरिंग, कृषी उत्पादने आणि पॅकेजिंग उद्योगातील उत्पादनांबद्दल विशेष रस आहे. त्यामुळे कोल्हापुरातील उद्योग-व्यापाऱ्यांना इंडोनेशियाशी भागीदारी करणे सहज शक्य होईल. या अनुषंगाने महाराष्ट्र चेंबरच्या वतीने कोल्हापुरातील उद्योजकांचे शिष्टमंडळ इंडोनेशियाला नेण्यात येईल.
यावेळी कमलाकांत कुलकर्णी, शांताराम सुर्वे, उद्योजक सचिन शिरगावकर, सुनील शेळके, जयेश ओसवाल, एस. डी. पेंडसे, रोनक शहा, मनोज झंवर, धैर्यशील पाटील, राहुल नष्टे, धनंजय दुग्गे, ओंकार पोळ, हर्षवर्धन मालू, नितीन वाडीकर, प्रीतेश कर्नावट उपस्थित होते.