भारत–अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार; राजू शेट्टींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:00 IST2026-02-04T10:44:34+5:302026-02-04T11:00:33+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा, बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा केली.

भारत–अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार; राजू शेट्टींचा हल्लाबोल
कोल्हापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा, बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा केली. याअंतर्गत भारतावर लादण्यात आलेला करही १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान आता भारत अमेरिकेकडून अनेक वस्तु खरेदी करणार आहे. दरम्यान, आता या करारावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली.
“हा व्यापार करार मंजूर झाला, तर भारतातील शेतकरी आणि दुग्धोत्पादकांचे कंबरडे मोडेल. हा करार म्हणजे थेट भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला दिलेली संमती आहे,” असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला.
"...तर त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय?"; शरद पवारांचा CM देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
राजू शेट्टी म्हणाले की, या करारामुळे अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आदी उत्पादने मोठ्या प्रमाणावर भारतात आयात केली जातील. परिणामी, देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळणार नाही आणि देशांतर्गत बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. “अमेरिकन शेतीला मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. अशा परिस्थितीत भारतीय शेतकरी स्पर्धा कशी करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या कराराचा सर्वाधिक फायदा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना होणार असल्याचा आरोप करत शेट्टी म्हणाले, “हा करार मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यासारख्या उद्योगसमूहांना लाभदायक ठरेल. मात्र भारतीय साखर उद्योग, दुग्धव्यवसाय आणि लघु शेतकरी पूर्णपणे मोडून पडतील.”
यावेळी त्यांनी पीएम मोदींवरही टीका केली. “डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आमच्या ‘५६ इंच छातीच्या’ पंतप्रधानांनी नांगी टाकून या करारावर सही केली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असा आरोप त्यांनी केला. हा करार देशहिताचा नसून परदेशी आणि कॉर्पोरेट हितसंबंध जपणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, “हा करार मंजूर झाला तर आता डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात बोलावून एकदा भारतीय शेतकऱ्याचा श्राद्ध घालणे एवढेच बाकी राहील,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या मुद्द्यावर शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगत, राजू शेट्टी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. “हा करार मागे घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.