प्रशांत कोरटकरवरुन इंडिया आघाडीचे राजकारण : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:12 IST2025-03-07T14:11:53+5:302025-03-07T14:12:54+5:30

शंभरावर कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

India Aghadi politics on Prashant Koratkar says Chief Minister Devendra Fadnavis | प्रशांत कोरटकरवरुन इंडिया आघाडीचे राजकारण : मुख्यमंत्री

प्रशांत कोरटकरवरुन इंडिया आघाडीचे राजकारण : मुख्यमंत्री

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीसंदर्भात प्रशांत कोरटकर याच्याविरोधात तातडीने गुन्हा नोंदवला आहे. स्थानिक न्यायालयाने त्याच्या अटकेला अंतरिम स्थगिती दिली असली, तरी स्थगिती उठवण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करण्यात आले आहे. पोलिस कोरटकरच्या कस्टडीची गरज न्यायालयाला पटवून सांगतील. काही लोकांना त्याच्यावर केवळ राजकारण करायचं आहे, ते त्यांना करू द्या, अशा शब्दात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनाबाबत भाष्य केले.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देत असताना भाजपचा कार्यकर्ता प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचाही अवमान केला होता. त्याबाबत कोल्हापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोरटकरला राज्य सरकारचे समर्थन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा इंडिया आघाडीकडून देण्यात आला होता.

या आंदोलनाकडे पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले आणि कोरटकरच्या अटकेबाबत विचारणा केली. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी कोरटकर याच्याविरोधात तत्काळ गुन्हा नोंदवला. अटकेची कारवाई सुरू असतानाच स्थानिक न्यायालयाने कोरटकरच्या अटकेला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्परतेने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी होईल तेव्हा पोलिस ही स्थगिती उठवावी म्हणून त्याच्या कस्टडीची गरज असल्याचे पटवून सांगतील.

शंभरावर कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

प्रशांत कोरटकरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभय आहे, असा आरोप करत त्यांच्या गुरुवारच्या कोल्हापूर दौऱ्यात गनिमी काव्याने निदर्शने करण्याचा इशारा दिलेल्या इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाने आधीच पकडले. मुख्यमंत्री कोल्हापूर शहरात येण्याआधीच शंभरहून अधिक कार्यकर्त्यांची धरपकड केल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा सुखरूपपणे पार पडला.

Web Title: India Aghadi politics on Prashant Koratkar says Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.