सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठीच वाढ, महादेवराव महाडिकांच्या टीकेवर गोकुळ प्रशासनाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 15:50 IST2025-07-18T15:49:31+5:302025-07-18T15:50:12+5:30
गोकुळची नफा, ठेवीत उच्चांकी वाढ

सभासदांच्या प्रतिनिधित्वासाठीच वाढ, महादेवराव महाडिकांच्या टीकेवर गोकुळ प्रशासनाचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : ‘गोकुळ’ला रोज १२३६ गावांतील ६३१६ दूध संस्थांच्या माध्यमातून दूध येते. बारा तालुक्यांतील सभासदांना प्रतिनिधित्व मिळत नाही. यासाठी संचालक मंडळाची संख्या २५ केली आहे. संघाने गेल्या चार वर्षांत दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार करत कार्यक्षमतेचा नवा उच्चांक गाठला आहे. शेतकरी हित, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार या त्रिसूत्रीवर संघाने नफा व ठेवीत उच्चांकी वाढ केल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी पत्रकातून दिली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तत्परतेने दिली आहेत.
डॉ. गोडबोले म्हणाले की, संघाचे दैनंदिन सरासरी दूध संकलन १२.२२ लाख लिटर होते. मागील चार वर्षांत हे संकलन ३.७२ लाख लिटरने वाढून १५.९४ लाख लिटर इतके झाले आहे. गतवर्षी उच्चांकी असे १८.६० लाख लिटर संकलन झाले आहे. चार वर्षांत संघाने सरासरी म्हैस दुधाला १२ रुपये, तर गाय दुधाला ६ रुपये दरवाढ दिली आहे. अशी दरवाढ आणि हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त अधिकचा दूध दर फरक देखील दिला असल्यामुळेच ‘गोकुळ’चे संकलन आणि संस्थांचा ‘गोकुळ’साठीचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.
दृष्टिक्षेपात ‘गोकुळ’ची प्रगती
आर्थिक वर्ष ठेवी ढोबळ नफा उलाढाल
२०२३-२४ - २४८ कोटी २०९ कोटी ३६७० कोटी
२०२४-२५ - ५१२ कोटी २१५ कोटी ३९६६ कोटी
आयकर परताव्याची ठेवीत गुंतवणूक
संघास २०१७-१८ या आर्थिक वर्षात २५.७१ कोटी व २०२३-२४ मध्ये ५.८४ कोटी असे ३१.५५ कोटी आयकर परतावा स्वरूपात रक्कम मिळाली. ही रक्कम ठेवीत गुंतवणूक केल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.
भोकरपाडा जमिनीचा व्यवहारच नाही
भोकरपाडा एमआयडीसीची जमीन खरेदी केल्याने संघाला होणारा फायदा, होणारी गुंतवणूक या सर्वांचा अभ्यासही केला होता; पण तांत्रिक अडचणी आल्याने या जमिनीचा व्यवहार होऊ शकला नाही आणि व्यवहार न झाल्याने संघाने एकही रुपया येथे खर्च केलेला नसल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.
कोटेशननुसारच खरेदी
संघाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना जाजम व घड्याळ भेट दिले. त्यासाठी रीतसर कोटेशन घेऊन कमीत कमी दराने त्याची खरेदी केले. टप्प्याटप्प्याने बिल अदा केल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.
ऑक्सिजन प्रकल्प सामाजिक बांधिलकी म्हणूनच..
कोविडच्या काळात ऑक्सिजनसाठी लोक मृत्युमुखी पडत होते. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन ‘गोकुळ’ने ४५.९६ लाखांचा प्रकल्प उभा केला. त्यातून ५६ हजार रुपयांची ऑक्सिजनची विक्री झाली. सुदैवाने कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी थांबल्याने हा प्रकल्प बंद आहे. उत्पन्नासाठी नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून या प्रकल्पाची उभारणी केल्याचे डॉ. गोडबोले यांनी सांगितले.