Fuel price hike : पेट्रोल पंपाची मदार आता फक्त दुचाकींवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 16:51 IST2021-12-11T16:50:35+5:302021-12-11T16:51:34+5:30
इंधनाचे भाव वाढल्याने वाहनधारक चारचाकीचा जास्त वापर करत नसल्याने दुचाकीचा वापर वाढला आहे.

Fuel price hike : पेट्रोल पंपाची मदार आता फक्त दुचाकींवरच
सचिन भोसले
कोल्हापूर : इंधनाचे भाव वाढल्याने वाहनधारक चारचाकीचा जास्त वापर करत नसल्याने दुचाकीचा वापर वाढला आहे. या वापरामुळे पेट्रोल पंपांवर केवळ दुचाकीच्याच वाहनांच्या रांगा अधिक दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह शहरातील पेट्रोल पंपांची मदार केवळ दुचाकीवरच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ३४३ पंप कार्यान्वित आहेत.
पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांनी पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बाइकचा आधार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या महिन्याच्या इंधन खर्चात बचत होत आहे. प्रति कि.मी. ४० ते ६० पैसे इतकाच खर्च येत असल्याने अनेकांचा ओढा इलेक्ट्रीक बाइककडे वाढला आहे. त्यामुळे १६४० ई-बाइक आता जिल्ह्यातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. हा आकडा रोज वाढतच आहे.
रिक्षांमध्ये एलपीजी, कारमध्ये सीएनजी
पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजी प्रति किलोचे दर ७६.५० पैसे इतके कमी व मायलेजही चांगले देत असल्याने अनेक कारचालकांनी पेट्रोल चारचाकीला सीएनजी किट बसवून घेतले आहे. अनेकांनी सीएनजी कारच खरेदी केल्या आहेत. त्यामुळे सीएनजीचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. तर रिक्षांमध्येही सीएनजीचा वापर वाढला आहे. तर काही रिक्षाचालक एलपीजीही वापर करीत आहेत.
डिझेल, पेट्रोल विक्रीवर परिणाम
पेट्रोल, डिझेलच्या रोजच्या दरवाढीमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी सीएनजीचा पर्याय निवडला आहे. याशिवाय जिल्ह्याला कर्नाटकची सीमा लागून आहे. तेथे पेट्रोल, डिझेलमध्ये किमान सात ते आठ रुपये स्वस्त असल्याने तेथे जाऊन पेट्रोल, डिझेल भरून येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर झाला आहे. विशेषत: इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, एमआयडीसी, जयसिंगपूर, आदी ठिकाणच्या पंपांवर परिणाम झाला आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली.
जिल्ह्यात पंप असे,
पेट्रोल पंप - ३४३
सीएनजी - ७
एलपीजी -५
इंधनाच्या किमती
इंधन भाव रोजची विक्री
पेट्रोल (प्रतिलिटर) ११०.०७ ५, ४०,००० लिटर
डिझेल (प्रतिलिटर) ९२.६४ ६, २०,००० लिटर
सी.एन.जी. (प्रति किलो) ७६.५० १०,५०० किलो
शहरातील वाहने
दुचाकी - १०, ३१, ३०१
तीनचाकी -१५,०००
व्यावसायिक वाहने - ५७, ६६०
ई- बाइक - १६८०